मुंबई : दादरच्या कबुतरखान्याचा वाद अद्याप मिटलेला नाही. त्यातच लालबागमधील जैन समाजातील एका व्यक्तीने कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. स्वत:च्या गाडीच्या टपावरच दाणे टाकून त्याने ती कबुतरखान्याजवळ उभी केली. यामुळे स्थानिक रहिवासी कमालीचे संतप्त झाले. त्यांनी खडे बोल सुनावल्यानंतर त्या व्यक्तीला तेथून काढता पाय घ्यावा लागला.

मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबई महापालिकेने दादरमधील कबूतरखाना ताडपत्रीने झाकला. मात्र कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यामुळे जैन समाजातील नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला. दादर येथील कबुतरखाना परिसरात जैन समाजातील नागरिकांनी सोमवारी आंदोलन केले. सकाळी १० च्या सुमारास मोठ्या संख्येने आंदोलक तेथे जमले होते. त्यांनी तेथील कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडली. काही आंदोलक आत शिरले व त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्याचबरोबर सोबत आणलेले खाद्य तेथे पसरवले. कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यासाठी उभारलेले बांबू आंदोलकांनी तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते. मात्र, तरीही आंदोलकांनी कबुतरखान्यात प्रवेश केला. या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे.

जैन इसमाची अनोखी शक्कल

या प्रकरणावरून सध्या वातावरण तापलेले असतानाच लालबागमध्ये रहाणाऱ्या महेंद्र सकलेचा यांनी आपल्या मोटारगाडीवर ट्रे बांधून त्यात कबुतरांसाठी खाद्या घातले आणि ती गाडी शनिवारी सकाळी दादरमधील कबूतरखान्याजवळ उभी केली. खाद्य पाहून कबुतरे गाडीच्या टपावर येऊन खाद्य खाऊ लागले.

स्थानिकांमध्ये संताप

हा प्रकार पाहताच स्थानिक रहिवासी संतप्त झाले. स्थानिक रहिवाशांनी सकलेचा यांना विरोध करत हरकत घेतली. कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई करण्यात आल्याची आठवण रहिवाशांनी सकलेचा यांना करून दिली. यावरून उभयतांमध्ये शाब्दीक कचकम उडाली. अखेर स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केल्यानंतर सकलेचा यांनी तेथून काढता पाय घेतला.