समीर कर्णुक, लोकसत्ता

मुंबई : चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीतील घराघरात चालणारा आणि कोटय़वधी रुपयांची उलाढाल असलेला चप्पलांचा व्यवसाय गेल्या महिन्याभरापासून देशात टाळेबंदी असल्याने पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी हजारो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मागील ५० ते ६० वर्षांपासून चेंबरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत राजस्थानमधील रेगर समाजाकडून हा व्यवसाय सुरू आहे. या संपूर्ण परिसरात २० ते २५ हजार रेगर समाजाची वस्ती असून प्रत्येक घरामध्ये विविध प्रकारच्या चप्पल तयार केल्या जात आहेत. या चप्पालांची विक्री संपूर्ण देशासह विदेशात देखील केली जाते. मात्र करोनामुळे टाळेबंदी असल्याने बाहेरून कच्चा माल देखील उपलब्ध होत नाही. शिवाय चपलांची बाहेर विक्री देखील होत नसल्याने हा संपूर्ण व्यवसाय गेल्या महिन्याभरापासून पूर्णपणे ठप्प झाला आहे.

घरात चप्पल तयार झाल्यानंतर ती परिसरातच असलेल्या चप्पल बाजारात जाते. याठिकाणी विक्रीची ३०० होलसेल दुकाने आहेत. तिथून या चपलांची विक्री केली जाते. त्यामुळे या व्यवसायावर येथील दुकानदार, कारागीर आणि व्यापारी अशा हजारो कुटूंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र महिन्याभरापासून हाताला कामच नसल्याने अनेकांवर सध्या उपासमारीची वेळ आहे. रोज काम केल्यानंतर आठ दिवसाला आम्हाला कामाचे पैसे मिळतात. मात्र सध्या हाताला काम नसल्याने, कुटुंबियांना काय खायला घालायचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर असल्याचे येथील एक कारागीर सरोज यांनी के ला.

त्यातच हा परिसर अगदीच दाटीवाटीने वसलेला असल्याने, येथे करोनाचा शिरकाव झाल्यास मोठे, नुकसान होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या मूळगावी जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. टाळेबंदी उठल्यास तत्काळ गावाकडचा रस्ता धरण्याच्या तयारीत हे कारागीर आहेत.  टाळेबंदी उठल्यास तत्काळ गावाकडे जाण्याची तयारी केली आहे.

सर्वांवर उपासमारी

कॉलनीत लहान मुलांपासून महिला आणि पुरुषांसाठी सर्वच प्रकारच्या चप्पला आणि बूट तयार केले जातात. ३५ ते ४० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंतच्या विविध प्रकारच्या चप्पला याठिकाणी तयार होतात. त्यामुळे कच्चा माल विकणारे, त्याची ने आण करणारे देखील या व्यवसायावर अवलंबून आहेत.