मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) अद्यापही ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी सात हेक्टर जागेची प्रतीक्षा आहे. कांजूरमार्ग कारशेडसाठी उपलब्ध असलेली जागा अपुरी पडत असल्याने अतिरिक्त सात हेक्टर जागेची मागणी एमएमआरडीएने केली आहे. येत्या काही दिवसात कारशेडच्या कामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे ही जागा लवकरात लवकर ताब्यात येणे एमएमआरडीएसाठी आवश्यक आहे.

मेट्रो ६ मार्गिकेची कारशेड कांजूरमार्ग येथे प्रस्तावित आहे. मात्र ही जागा वादात अडकल्याने मेट्रो ६ चे काम सुरू होऊनही अनेक दिवस झाल्यानंतरही कारशेडची जागा ताब्यात आली नव्हती. पण अखेर जागेचा वाद मिटला आणि काही महिन्यांपूर्वी कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात आली. ही जागा ताब्यात येताच एमएमआरडीएने कांजूरमार्ग कारशेडच्या कामासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये निविदा प्रसिद्ध केली. आता मार्चमध्ये निविदा अंतिम करण्यात आली असून आता लवकरच कारशेडच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र त्याचवेळी सात हेक्टर जागेची एमएमआरडीएला प्रतीक्षा आहे.

हेही वाचा… प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेची ७,३११ कोटींची कमाई

हेही वाचा… दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

कारशेडसाठी १५ हेक्टर जागा अपुरी पडत असल्याने एमएमआरडीएने अतिरिक्त सात हेक्टर जागेची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र अद्याप ही जागा ताब्यात आली नसल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही जागा ताब्यात यावी यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कारशेडबाबतची निविदा अंतिम झाल्याने आता लवकरात लवकर कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर मेट्रो ६ मार्गिकेचे कामही लवकर पूर्ण करून ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. अतिरिक्त सात हेक्टर जागा मिळवून कारशेडच्या कामासही सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अतिरिक्त सात हेक्टर जागा मिळविण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे.