मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येपूर्वी मुंबईत अंमलीपदार्थ विरोधी कारवायांना वेग आला असून महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे १२७३ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत १२ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, ४८ तासांमध्ये डीआरआयने मुंबई विमानतळावरू सुमारे २१ कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे.

अमोईन मारी कौऊएमे (३०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती आयवरी कोस्ट देशाची नागरिक आहे. इथोपियातून गुरुवारी पहाटे येणाऱ्या एका महिलेकडे अंमलीपदार्थ असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे विमानतळावर डीआरआयचे अधिकारी तैनात करण्यात आले होते. त्यावेळी महिलेची झडती घेतली असता काहीच सापडले नाही. पण तिच्याकडील बॅगेत १२७३ ग्रॅम भुकटी सापडली. तपासणीत ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कोकेन जप्त करण्यात आले असून याप्रकरणी अमोईनला अटक करण्यात आली. तिच्याविरोधीत अंमलीपदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – मुंबई: कर्मचार्‍याची हत्या करून बँकेवर टाकला दरोडा, स्निफर डॉग आणि १० वर्षांच्या मुलीमुळे दोन दरोडेखोर गजाआड

हेही वाचा – एटीएसच्या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात

चौकशीत इथोपियातील एका व्यक्तीने तिला कोकेन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. डीआरआयने मंगळवारी युगांडामधील फातुमा नाकीतेंदे (४०) या महिलेला ८९० ग्रॅम कोकेनसह अटक केली होती. त्याची किंमत आठ कोटी ९० लाख रुपये होती. तिच्या डोक्यातील विग व अंतर्वस्त्रामध्ये कोकेन लपवले होते. आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे कोकेनची तस्करी करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने चौकशीत सांगितले. त्यासाठी तिला एक हजार डॉलर्स (८३ हजार रुपये) मिळणार होते. पण त्यापूर्वीच तिला अटक झाली. दोन्ही प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. नववर्षानिमित्त आयोजित पार्ट्यांसाठी या कोकेनचा पुरवठा केला जाणार होता. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या असून विमानतळावरील संशयीत प्रवाशांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.