मुंबई : बेकायदेशीर ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणुकदारांची सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आलिशान बोटी, महागड्या मोटरगाडीसह एकूण १३१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. विशेष म्हणजे या मालमत्ता स्पेनमध्ये आहेत.
कारवाईत टाच आणण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये आलिशान यॉट, मिनिजेट बोट, महागड्या मोटरगाड्या आणि स्पेनमधील दोन स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. ही कारवाई मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत करण्यात आली. ही संपत्ती ऑक्टाएफएक्स प्रकरणाचा सूत्रधार पावेल प्रोजोरोव याच्याशी संबंधित आहे. मालमत्तांमध्ये “चेरी” नावाची आलिशान यॉट, एक मिनिजेट बोट, एक आलिशान कार आणि स्पेनमधील दोन आलिशान निवासस्थानांचा समावेश आहे.
पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात ॲप आणि त्याच्या प्रवर्तकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या आधारे ईडी याप्रकरणात तपास करीत आहे. ऑक्टाएफएक्स ॲप आणि वेबसाईट फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये व्यवहार करण्यासाठी आरबीआयकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. तरीसुद्धा, प्लॅटफॉर्मचा समाज माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करण्यात आला. चित्रपट व टीव्हीवरील कलाकारांद्वारे जाहिराती करण्यात आल्या होत्या.
विदेशी मुद्रा व्यापार सुलभ करण्याच्या नावाखाली गुंतवणुकदारांना ऑक्टाएफएक्स ट्रेडिंग ॲप आणि वेबसाईटवर विविध भारतीय बँकांची मोठ्या प्रमाणात खाती दाखवली जात होती. यात मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आला होता. ती खाती उघडण्यासाठी बनावट कंपन्यांचे संचालक, बनावट केवायसी कागदपत्रे सादर करण्यात आली होती, असा आरोप आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टाएफएक्सने अनेक वेळा आपले लॉगिन यूआरएल आणि संकेतस्थळाचा ॲड्रेस बदलून फसवणूक लपवण्याचा प्रयत्न केला. ईडीच्या तपासानुसार, कंपनीने त्याद्वारे भारतात केवळ ९ महिन्यांत सुमारे ८०० कोटी रुपये कमवले. ती रक्कम बनावट सेवा आयातीच्या नावाखाली स्पेन, एस्टोनिया, रशिया, हाँगकाँग, सिंगापूर, यूएई आणि युके येथील पावेल प्रोजोरोवच्या नियंत्रणातील संस्थांना पाठवण्यात आली. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत २९६ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यामध्ये स्पेनमधील पावेल प्रोजोरोवच्या १९ मालमत्तांचा समावेश आहे. याप्रकरणी ऑक्टाएफएक्स आणि इतर ५४ आरोपींविरुद्ध २ आरोपपत्रे दाखल करण्यात आली असून विशेष पीएमएल न्यायालयाने या आरोपपत्रांची दखल घेतली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
आम्ही कोणतीही खोटी आश्वासने देत नाही, ग्राहकांच्या हितासाठी काम करतो. ऑक्टाएफएक्स या आंतरराष्ट्रीय फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मने उच्च परताव्याचे खोटे आश्वासन, जलद श्रीमंती किंवा हमखास नफा मिळवून कोणतेही दावे केले नाहीत. त्याबाबतच्या सर्व आरोपांचे आम्ही खंडन करीत आहोत. ट्रेडरचे नुकसान होईल, अशा कोणत्याही व्यवहारात आमचा सहभाग नाही. फॉरेक्स ट्रेडिंग ही ज्ञानावर आधारित व विचारपूर्वक केली जाणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना प्रशिक्षित करण्यावर आणि त्यांची आर्थिक जाण वाढवण्यावर सातत्याने भर देतो. आम्ही आमच्या ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत पेमेंट सेटलमेंट प्रणाली विकसित केली आहे. जगभरातील इतर ब्रोकर्सप्रमाणे आम्हीही ग्राहकांची रक्कम परत करण्यासाठी विविध पेमेंट यंत्राणा आणि सेवा पुरवणाऱ्यांसोबत काम करतो. त्यात आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. आम्ही पेमेंट गेटवेच्या ओळखी लपवण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही. पेमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या यूआरएल या तांत्रिक बाबी असून, त्या संबंधित सेवा देणाऱ्यांवर अवलंबून असतात. त्याच्या निर्मितीत आमचा सहभाग नाही. आमची यंत्रणा पारदर्शी असून उद्योगातील प्रचलित मानकांनुसारच आहे, असेही ऑक्टाएफएक्सकडून सांगण्यात आले.