मुंबई : आम्ही हिंदूत्ववादी आहोत. काही जण आम्ही विचार सोडले असे सांगत सुटले आहेत. शिवसेना कधीही हिंदूत्व सोडणार नाही असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसबरोबर शिवसेना गेल्याने शिवसेनेने हिंदूत्व सोडले, असा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
हेही वाचा >>> पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केल्यास जशास तसे उत्तर! उद्धव ठाकरे यांना भाजपचा इशारा
गेली २५-३० वर्ष भाजपबरोबर राहूनदेखील शिवसेना भाजपसारखी होऊ शकली नाही तर ती दोन वर्षांत काँग्रेसबरोबर गेल्याने काँग्रेससारखी कशी होईल, असे प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावरील भाषणात ठाकरे यांच्यावर टीका करताना एक फुल व एक हाफचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका असा टोला मारला होता. त्याला ठाकरे यांनी उत्तर दिले. भाजपचे माजी राज्य प्रवक्ते व पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते एकनाथ पवार यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेना ठाकरे गटाने पक्षाचे संघटनपद दिले आहे.