मुंबई : महाराष्ट्राची बदललेली सामाजिक, राजकीय संस्कृती, भाषा आणि वाणी क्लेशदायक असून हे चित्र बदलण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करू या, असे आवाहन माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी नुकतेच केले.
ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक, रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘अध्यक्ष नसलेले ‘माझे’ असेही एक पत्रकार संमेलन’ दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे भरवण्यात आले होते. त्या संमेलनात धर्माधिकारी बोलत होते. या संमेलनास विविध मराठी वृत्तपत्रातील ज्येष्ठ आणि तरुण पत्रकार उपस्थित होते.
‘माध्यमांपासून खरे तर न्यायालयांनी दूर राहिले पाहिजे. नागरिकांचे जे काही म्हणणे असते ते कोणालाच समजत नसते. काही जागरूक पत्रकार/ प्रसार माध्यमांच्यामार्फत ते न्यायाधीश/ न्यायालयापर्यंत पोहोचत असते. पण तरीही तो संबंध चांगला नाही. आज बरेचदा भावनेच्या भरात लोक काहीही बोलतात. त्याने न्यायालयाचा अवमान होत नाही, पण ती संधी मिळू शकते. ते झाले की जे अपरिमित नुकसान होते ते भरून काढता येत नाही’, अशी खंतही धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना जाहीर झाला असून धर्माधिकारी यांच्या हस्ते महेश म्हात्रे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
‘माझ्या खिशात दमडा नाही, पण ज्यांच्या खिशात दमडा आहे ते सारे माझ्या खिशात आहेत’, अशी शाब्दिक फटकेबाजी करत अशोक मुळ्ये यांनी या आगळ्या वेगळ्या संमेलनामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. संमेलनाचा समारोप विद्या करलगीकर, डॉ. शिल्पा मालंडकर आणि प्रसिद्ध गायक श्रीरंग भावे यांनी सादर केलेल्या मराठी भावगीते व चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाने झाला. त्यांना प्रसाद पंडित (तबला) व सागर साठे (संवादिनी) यांनी संगीतसाथ केली.