Deepak Kesarkar on Rohit Arya: मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक इसमाने आज दुपारी १७ मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली. सदर माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ओलीस ठेवलेले १७ मुले आणि २ वृद्ध नागरिकांची सुखरूप सुटका केली. मात्र यात रोहित आर्यवर गोळीबार करण्यात आला. यात दुखापत झाल्यामुळे उपचार सुरू असताना रोहित आर्य मृत्यूमुखी पडला. ही बातमी समोर आल्यानंतर माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावर भाष्य केले.
शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यचा संपर्क आला होता, असे केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. रोहित आर्य याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रकल्पात स्वच्छता मॉनिटर ही संकल्पना मांडल्याचे केसरकर यांनी सांगितले. पण नंतर त्याला या कामातून बाजूला करण्यात आले. शासनाने कामाचे दोन कोटी रुपये थकवल्याचा आरोप रोहित आर्यने केला होता. यासाठी दीपक केसरकर यांच्या घरासमोर त्याने आंदोलनही केले होते.
रोहित आर्यने १७ मुलांना ओलीस ठेवल्याचे समोर आल्यानंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलत असताना त्याच्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “मी रोहित आर्यला चेकने पैसे दिले होते. त्याचा दोन कोटी रुपयांचा दावा योग्ट वाटत नाही. सरकारची काम करण्याची एक पद्धत असते. मात्र अशापद्धतीने मुलांना ओलीस ठेवणे योग्य नाही.”
दीपक केसरकर पुढे म्हणाले, माझी शाळा, सुंदर शाळा योजनेत रोहित आर्यला काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी परस्पर काही पैसे उचलल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे त्यांना बाजूला करण्यात आले. या विषयात त्यांनी शिक्षण विभागाशी बोलायला हवे होते. पण अशाप्रकारे कुणाला ओलीस ठेवणे चुकीचे आहे.
कशी झाली मुलांची सुटका?
दुपारी १.४५ वाजता पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलांना सोडविण्याची रणनीती आखली. रोहित आर्यने ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका केल्यानंतर पोलीस निरीक्षक जीवन सोनावणे यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सर्व मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आल्याचे सोनावणे यांनी सांगितले.
कोण आहे रोहित आर्य?
रोहित आर्य हे स्वच्छता अभियानाचे प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगत असत. त्यांनी स्वच्छता अभियानावर आधारित लेट्स चेंज नावाचा लघुपट केला होता. त्याचे गुजरातमध्ये प्रदर्शन करून २०१३ मध्ये गुजरातमध्ये त्याचे ही मोहीम त्यांनी सुरू केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रकल्पाची संकल्पना आवडल्याने त्यांनी गुजरातमध्ये तो राबवण्याचे आदेश दिले होते, असा दावाही रोहीत आर्य यांनी यापूर्वी वारंवार केला आहे. शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करावे अशी त्यांची संकल्पना होती.
