मुंबई : ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) समन्स पाठवून २३ जानेवारीला चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण या चौकशीला वायकर अनुपस्थित राहिले. आरोग्याचे कारण देऊन चौकशीला अनुपस्थित राहत असल्याचे वायकर यांच्याकडून कळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई : देवनारची हवा वाईट; वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण वाढले; काळजी घेण्याचे आवाहन

यापूर्वी ईडीने समन्स पाठवून वायकर यांना १७ जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले होते. पण चौकशीला वायकर उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे ईडीने पुन्हा समन्स पाठवून त्यांना २३ जानेवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण यावेळीही वायकर यांनी आरोग्याचे कारण देऊन चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कालावधी मागितला आहे. जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत ईडी तपास करीत आहे. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने नोव्हेंबर महिन्यात एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल केला होता. त्याप्रकरणी ईडीने वायकर यांच्या घरासह सात ठिकाणी छापे टाकले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवार यांची उद्या, तर पेडणेकर यांची परवा चौकशी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स पाठवून बुधवारी चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच मृतदेहाच्या पिशव्या खरेदी प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स पाठवून २५ जानेवारीला चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.