मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील तिसऱ्या मेट्रो गाडीचे चार डबे शनिवारी आरे कारशेडमध्ये दाखल झाले. आता लवकरच आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथून तिसऱ्या गाडीचे आणखी चार डबे मुंबईत दाखल होणार आहेत. हे डबे आल्यानंतर डब्यांची जोडणी करून गाडीची चाचणी केली जाणार आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो ३ च्या कामाला तसेच आरे कारशेडच्या कामाला प्रचंड वेग देण्यात आला आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत आरे कारशेड आणि आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा पूर्ण करून पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. त्यामुळे काम वेगात सुरू आहे. बांधकाम वेगात सुरू असतानाच दुसरीकडे मेट्रो गाड्या तयार करून घेणे, त्या मुंबईत आणून त्यांची चाचणी घेणे ही कामेही वेगात सुरू आहेत. त्यामुळेच दोन गाड्या मुंबईत आणल्यानंतर आता शनिवारी तिसऱ्या गाडीचे चार डबे मुंबईत दाखल झाले आहेत. हे डबे आरे कारशेडमध्ये ठेवण्यात आले आहेत. आता लवकरच आणखी चार डबे मुंबईत दाखल होणार आहेत. हे डबे आल्यानंतर त्यांची जोडणी करून तिसऱ्या गाडीची चाचणी सुरू केली जाणार असल्याचे एमएमआरसीकडून सांगण्यात येत आले आहे.

हेही वाचा – “देशातील जातीभेद संपण्यासाठी अजून दोन पिढ्यांचा कालावधी जावा लागेल” विचारवंत डॉ. सुरज एगंडेचं परखड मत

आरे कारशेडमध्ये आलेली आणि चाचणी होणारी ही पहिली गाडी आहे. आरे कारशेड वादात अडकल्याने तिचे काम होऊ शकले नव्हते. मात्र सारीपुत नगर येथे तात्पुरती कारशेड बांधून तेथे पहिली मेट्रो गाडी आणण्यात आली आणि तिथेच या गाडीच्या चाचण्या घेण्यात आल्या. दुसरी गाडी सारीपुत नगरमधील तात्पुरत्या कारशेडमध्ये आणण्यात आली. सध्या या दोन्ही गाड्यांची नियमित चाचणी येथे होते. दरम्यान आरे कारशेडमध्ये काम करण्यास राज्य सरकारने संमती दिल्यानंतर एमएमआरसीने कारशेडच्या कामाला वेग देऊन तेथे गाड्या आणून चाचणी घेण्यासाठी आवश्यक काम बऱ्यापैकी पूर्ण केले आहे. त्यामुळे तिसऱ्या गाडीचे चार डबे थेट आरे कारशेडमध्ये नेण्यात आले आहेत.

हेही वाचा – “‘डेथ वॉरंट’ निघालं, १५ दिवसात सरकार कोसळणार”, राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरे म्हणाले…

मेट्रो ३ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यासाठी नऊ गाड्यांची आवश्यकता असून त्यातील दोन गाड्या आणि तिसऱ्या गाडीचे चार डबे आले आहेत. आता लवकरात लवकर उर्वरित गाड्या मुंबईत आणून गाड्यांची चाचणी घेऊन या गाड्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज ठेवण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न असेल.