भेंडीबाजार येथून आंतरराष्ट्रीय विमातळावर टॅक्सीने जात असताना पश्चिम द्रुतगती मार्गावर बनावट पोलिसाने चार जणांना लुटल्याचा प्रकार घडला आहे. हे चारही जण मुंबई विमानतळावर जाऊन अबुधाबीसाठी विमान पकडणार होते. मात्र, बनावट पोलिसाने त्यांना मारहाण करून ६.२८ लाखांच्या मौल्यवान वस्तू, विदेशी चलन, त्याचे पासपोर्ट जप्त केल्याचा प्रकार १ नोव्हेंबर रोजी घटना घडला. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही वाचा- आज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरु

मंगळवारी रात्री साडेआठ वाजता मोहम्मद सय्यद, मोहम्मद रियान, मोहिउद्दीन ऐजाज आणि मोहम्मद धियार हे चौघेजण भेंडीबाजार येथून टॅक्सीने मुंबई विमातळाकडे निघाले होते. मात्र, वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून पश्चिम द्रुतगती मार्गावर आले असता, टॅक्सीच्या मागून एक चारचाकी आली. चारचाकी चालकाने टॅक्सी थांबवण्यास सांगितले. टॅक्सी थांबताच चारचाकीमधील एक जण उतरून टॅक्सीजवळ आला आणि आपण पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर चौघांची चौकशी करून माहिती घेतली. चौघांपैकी एकाने अबुधाबीला जाण्यासाठी निघालो आहे, असे सांगितले.

हेही वाचा- कारागृहातील दयनीय स्थिती दाखवण्यासाठी आरोपीची अजब क्लृप्ती; मेलेल्या डासांनी भरलेली बाटली न्यायालयात आणली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बनावट पोलिसाने चौघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचा मोबाइल हिसकावून चौघांना साहित्यासह टॅक्सीतून बाहेर काढले. बनावट पोलिसाने बॅगची झडती घेऊन सर्व रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू ताब्यात घेतल्या. कायद्याचा धाक दाखवून चौघांना पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देऊन त्यांचे पासपोर्टही जप्त केले. तसेच, त्यांना जबरदस्तीने एका वाहनात बसवून दहिसरला सोडून दिले. आरोपीने ६.२८ लाखांच्या मौल्यवान वस्तू, विदेशी चलन, काही रोख रक्कम लुटल्याचे पोलीस जबाबात म्हटले आहे.

चौघांनी सुरुवातीला वनराई पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेथून त्यांना खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. खेरवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.