मुंबई: कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी घेऊन एका वयोवृद्ध महिलेच्या बँक खात्यातून सुमारे पावणेसहा लाख रुपये काढणाऱ्या नोकराला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. निखील विद्याधर आचरेकर असे या २७ वर्षांच्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार विजयालक्ष्मी तारी(८२) या गोरेगाव परिसरात पतीसह राहतात. पती-पत्नी वयोवृद्ध असल्याने त्यांनी स्वत:ची देखभाल करण्यासह दैनंदिन कामासाठी निखीलला कामावर ठेवले होते. निखील हा मूळचा रत्नागिरी येथील रहिवासी असून तो गेल्या वर्षीपासून तरी यांच्या घरी राहात होता. त्यांच्या नातेवाईकानेच त्याला त्यांच्याकडे नोकरीसाठी पाठविले होते.

विजयालक्ष्मी यांना दरमाह तीस हजार रुपये निवृत्तीवेतन मिळत असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. घरातील सर्व दैनंदिन कामासह घरखर्चासाठी लागणारे पैसे बँकेतून काढून देणे आदी सर्व कामे निखील करीत होता.अनेकदा ते कोरा धनादेश देऊन त्याला बँकेतून पैसे काढण्यास सांगत होते. तो पैसे काढून त्यांना देत होता. त्यामुळे निखिलवर त्यांचा विश्‍वास होता. ऑक्टोबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत त्याने त्यांना तीन लाख रुपये बँकेतून काढून दिले होते. त्यांच्या दोन्ही बँकेचे पासबुक त्याच्याकडे होते. मात्र बँकेतून काढलेल्या हिशोबाची माहिती विचारल्यानंतर तो त्यांना टाळत होता. २५ ऑक्टोबररोजी तो दोन्ही बँकांचे पासबुक घेऊन पैसे आणतो असे सांगून निघून गेला आणि परत आला नाही.

हेही वाचा: बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला दूरध्वनी करणे पडले महागात; महिलेच्या बँक खात्यातून साडेअकरा लाख रुपये गायब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवस उलटूनही तो परत न आल्याने दिवाळीसाठी गावी गेला असावा असा तारी यांचा समज झाला होता. त्यामुळे त्या बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या असता त्यांनी दोन्ही बॅंक खात्यांची माहिती घेतली. त्यांच्या खात्यातून २० ऑक्टोंबर २०२१ ते २५ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत निखीलने पावणेसहा लाख रुपये काढल्याचे समजले. त्यांनी दिलेल्या कोर्‍या धनादेशावर त्याने जास्त रक्कम टाकून एक वर्षांत या पैशांचा अपहार केला. फसवणूक लक्षात येताच विजयालक्ष्मी तारी यांनी गोरेगाव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर निखील आचरेकर याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्याला अटक केली.