मुंबई : प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे असल्याचे भासवून त्यांच्या विक्रीद्वारे सुमारे १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश राजपाल व इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतीच मुंबईतील सहा ठिकाणी शोध मोहिम राबवली. यावेळी डिजिटल उपकरणांसह संशयीत कागदपत्रे जप्त करण्यात आली. बनावट चित्रांची विक्री, बनावट सत्यता प्रमाणपत्र आणि मूळ प्रमाणपत्रे तयार करणे, रोख रकमेद्वारे पैसे हस्तांतरित करणे याबाबत महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती लागली आहे. याप्रकरणी आर्ट गॅलरी, कॉर्पोरेट वकील आणि सराफा व्यापारी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या आधारे ईडीने तपासाला सुरूवात केली होती. याप्रकरणात तक्रारदार पुनील भाटीया यांना प्रसिद्ध चित्रकारांच्या नावाने बनावट चित्रे विकून त्यांची १७ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश राजपाल आणि विश्वांग देसाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईडीच्या तपासात या संपूर्ण प्रकरणात दक्षिण मुंबईतील एक प्रमुख आर्ट गॅलरी, कॉर्पोरेट वकील आणि सराफा व्यापारी यांचा समावेश असलेल्याचे उघडकीस आले आहे. त्यात मूळ चित्रांच्या बनावट कलाकृती अस्सल कलाकृती म्हणून दिल्या होत्या. टोळी राज घराण्यातील व्यक्ती, पुरातन कला संग्रहालय आणि कलाकृती जमा करणाऱ्या व्यक्तींकडे संबंधीत कलाकृती असल्याचा बहाणा करून विश्वास संपादन करायचे. त्यानंतर मूळ मालकाच्या नावाने बनावट प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे तयार करून या प्रतिकृती असलेल्या चित्रांची विक्री करायचे.प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन, एफ एन सौझा, जहांगीर साबावाला, एस एच रझा, एन एस बेंद्रे, राम कुमार यांच्यासारख्या चित्रकारांच्या चित्रांची बनावट प्रमाणपत्रे आरोपींनी तपास केल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा >>>‘उन्हाळ्याची सुट्टी असली तरी गाफील राहू नका’, उद्धव ठाकरेंचं मराठी मतदारांना आवाहन

या संपूर्ण गैरव्यवहारातील रक्कम चलनात आणण्यासाठी स्थानिक हवाला नेटवर्कचा वापर करण्यात आला. बनावट कलाकृतींच्या विक्रीतून निर्माण झालेली काही रोख रक्कम सराफा व्यापाऱ्यांच्या संगनमताने पुरातन वस्तू खरेदी करण्यासाठी वापरली गेली आणि नंतर नामांकित लिलावगृहांद्वारे त्या वस्तू लिलावात विकण्यात आल्या. ती रक्कम बँक खात्यांमध्ये प्राप्त झाली. याप्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे.

प्रकरण कसे उघड झाले ?

ताडदेव येथे राहणारे पुनीत भाटिया (५२) गुंतवणूकदार असून ते इन्वेस्टमेंट म्हणून काम करतात. मध्य प्रदेशातील राजेश राजपाल याच्यामार्फत प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले. या व्यक्तीने २३ जानेवारी २०२३ रोजी भाटिया यांच्याशी संपर्क साधला. प्रसिद्ध चित्रकार मनजीत बावा यांचे कृष्णाचे चित्र निवृत्त सनदी अधिकारी सुब्रता बॅनर्जी यांच्याकडे असून त्याची किंमत सहा कोटी ७५ लाख रुपये असल्याचे त्याने भाटिया यांना सांगितले. तसेच आणखी एका प्रसिद्ध चित्रकाराच्या नाव सांगून पावणेदोन कोटी रुपयांचे चित्र भाटिया यांना दाखवण्यात आले. भाटिया यांनी दोन्ही चित्रे खरेदी केली. त्यानंतर विविध चित्रकारांचे नाव सांगून राजपाल याच्याकडून भाटिया यांनी ११ चित्रे खरेदी केली.

हेही वाचा >>>वृद्ध साहित्यिक, कलाकारांना पाच हजार रुपये मानधन; मंत्रिमंडळाचा  निर्णय

भाटिया यांनी त्यासाठी धनादेशांद्वारे १७ कोटी ९० लाखांची रक्कम दिली. ती चित्र भाटिया यांनी त्यांच्या दिल्लीतील घरात लावली होती. त्यावेळी संबंधित चित्र मूळ चित्रकारांची नसल्याच्या प्रतिक्रिया भाटिया यांना मिळू लागल्या. त्यांनी निवृत्त सनदी अधिकारी बॅनर्जी यांच्याकडे चित्रांबाबत विचारणा केली. आपल्याकडे असे कोणतेही चित्र नव्हते. तसेच आपण कोणालाही चित्र विकले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाटिया यांनी सांताक्रुझ येथील स्वाक्षरी तज्ज्ञ कंपनीकडून चित्रांवरील स्वाक्षरींची पडताळणी केली असता त्या बनावट असल्याचा अहवाल भाटिया यांना प्राप्त झाला. राजपाल व मित्राच्या पार्टीमध्ये ओळख झालेल्या व्यक्तीने संगनमत करून आपली फसवणूक केल्याचे समजल्यानंतर भाटिया यांनी ताडदेव पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार फसवणूक, बनावट स्वाक्षरी करणे, कट रचणे अशा विविध कलमांतर्गत ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.