बनावट संकेतस्थळे, व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुकच्या माध्यमातून इच्छुकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीची इच्छुकांना प्रतीक्षा असतानाच या सोडतीच्या नावे सर्वसामान्य इच्छुकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. बनावट संकेतस्थळ आणि समाजमाध्यमातून इच्छुकांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न दलालांकडून सुरु आहेत. मुंबई मंडळाच्या निदर्शनास ही बाब आली असून त्याची गंभीर दखल मंडळाने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी म्हाडा प्राधिकरणाच्या दक्षता विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. चौकशीनंतर याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान नागरिकांनी अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये आणि म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीची प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन केले आहे.

हेही वाचा >>> ठाणे – बोरिवली भूमिगत मार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा; एल. ॲण्ड टी.ची निविदेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई आणि परिसरातील म्हाडाच्या घरांना प्रचंड मागणी आहे. त्यातही मुंबईसारख्या महागड्या शहरात म्हाडाच्या माध्यमातून खासगी विकासकांच्या तुलनेत कितीतरी पटीने कमी किंमतीत घरे उपलब्ध होतात. त्यामुळे मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या सोडतीला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो. या संधीचा फायदा घेऊन दलाल, समाजकंटक सक्रिय होतात आणि सर्वसामान्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करतात असे चित्र प्रत्येक सोडतीच्या वेळी दिसून येते. आता पुन्हा दलाल आणि समाजकंटक सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> मुंबईः विशेष मोहिमेत अडीच कोटींचे अंमलीपदार्थ जप्त, २१ जणांना अटक

बनावट संकेतस्थळ तयार करून त्यावरुन सोडतीची माहिती दिली जात आहे. दुसरीकडे म्हाडाचा लोगो वापरून बनावट व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत. फेसबुक, युट्युबच्या माध्यमातूनही सोडतीची माहिती देण्याच्या नावे फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असे मुंबई मंडळाकडून सांगण्यात आले. त्याची गंभीर दखल मंडळाने घेतली असून याप्रकरणाची दक्षता विभागीय चौकशी करत आहे. या चौकशीनंतर याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. जाहिरात लवकरच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच इच्छुकांनी अर्ज करावा. तसेच तोही म्हाडाच्या अधिकृत https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावरुन किंवा म्हाडाच्या अपवरुनच सोडतीसंबंधीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन मंडळाने केले आहे. अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये असेही आवाहन केले आहे. म्हाडाने सोडतीसाठी कोणतेही दलाल नेमलेले नाहीत. अर्जदारांनी कोणत्याही व्यक्तिशी परस्पर पैशांचा व्यवहार करू नये. कोणी अशाप्रकारे अशी फसवणूक करत असल्यास त्याची माहिती म्हाडाच्या दक्षता विभागाला वा मुंबई मंडळाला द्यावी असेही आवाहन यानिमित्ताने मुंबई मंडळाने केले आहे.