मुंबई : मालदिवचे मानद महावाणिज्यिक दूत बॉबी मोहंती यांचे बनावट धनादेश तयार करून त्यांच्याच शिपायाने दीड लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. बनावट धनादेश वटविण्याचा प्रयत्न करीत असताना तो पकडला गेला. त्याने तब्बल ५५ बनावट धनादेश तयार केले होते.

बॉबी मोहंती (५६) हे मालदिवचे मानद महावाणिज्यिक दूत आहेत. त्यांची टेक इंजिनीयअरिंग नावाची कंपनी असून या कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. कंपनीचे आर्थिक व्यवहार मोहंती बघत असतात. याशिवाय ते बॉबी मोहंती फाऊंडेशन ट्रस्ट या नावाची संस्था चालवतात. अंधेरीच्या वीरा देसाई मार्गावर त्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात ८ जण काम करतात. बँकेच्या कामांसाठी त्यांनी श्रीकांत गडतिया (२४) याची नियुक्ती केली आहे. मागील ६ वर्षांपासून मोहंती यांच्या कार्यालयात काम करत आहे. स्वाक्षरी केलेले धनादेश बँकेत जमा करणे, कागदपत्रांची ने-आण करणे आदी कामे गडतिया करत असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहंती यांचा एक धनादेश वटविण्यासाठी बुधवारी डीसीडीबी बँकेत शिपाई गडतिया गेला होता. बॉबी मोहंती फाऊंडेशन ट्रस्ट या नावाने श्रीकांत गडतिया याच्या वैयक्तिक खात्याचा हा धनादेश होता. मात्र बँकेच्या कर्मचाऱ्याला संशय आला आणि बँकेने मोहंती यांना फोन करून विचारणा केली. त्यावेळी मोहंती यांना धक्का बसला. कारण असा कुठलाही धनादेश त्यांनी दिलेला नव्हता. त्यावेळी अशाच प्रकार दीड लाखांचा धनादेश गडतिय याने दोन दिवसांपूर्वी आपल्या नावाने वटविल्याचे बँकने सांगितले. याबाबत मोहंती यांनी आरोपी गडतिया याच्याकडे विचारणा केली असता या फसणुकीचा खुलासा झाला. गडतिया याने मोहंती यांच्या नावाचे ५५ धनादेशांवर बनवाट सही मारून वटविण्यासाठी तयार ठेवले होते. त्याचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला. मात्र नंतर बँकेला संशय आल्याने त्याचे बिंग फुटले. प्रकरणी अंबोली पोलिसांनी गडतिया याच्या विरोधात फसवणूकप्रकरणी कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३३८ आणि ३४० (२) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.