मुंबई : सामान्य मुंबईकरांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून २ ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. मुंबईत सुमारे २२७ आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्रांमधून ही सेवा देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आरोग्य केंद्रांद्वारे सुमारे १३९ वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. झोपडपट्टीभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी फिरत्या वैद्यकीय पथकांची संख्या वाढवावी तसेच मॅमोग्राफीसाठीही मोबाइल गाडय़ा सुरू कराव्यात, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

हेही वाचा >>> पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गाला मान्यता द्या, मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांना विनंती

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हे दवाखाने आणि पॉलिक्लिनिक चालविण्यात येणार आहेत. सध्या ५० ठिकाणी या आरोग्य केंद्रांचे काम पूर्ण झाले असून शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत २२७ असे दवाखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये ३४ पॉलिक्लिनिक असणार आहेत. त्याद्वारे विशेषज्ञांची सेवा मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साधारणपणे २५ ते ३० हजार लोकसंख्येकरिता एक याप्रमाणे हे दवाखाने सुरू करण्यात येतील. सकाळी सात ते दोन, दुपारी तीन ते रात्री दहा अशी रुग्णांच्या सोयीनुसार दोन सत्रांत या दवाखान्याची वेळ असणार आहे. या दवाखान्यात एक डॉक्टर, परिचारिका, औषध वितरक आणि बहुउद्देशीय कामगार असे मनुष्यबळ असेल. पॉलीक्लिनिक महापालिकेच्या उपलब्ध दवाखान्यात अडीच ते तीन लाख लोकसंख्येसाठी असेल.  यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादरीकरण केले.