मुंबई : गडचिरोलीत कार्यरत असलेल्या ‘सर्च’ संचलित माँ दंत्तेश्वरी हॉस्पिटलमध्ये अलीकडेच ६१ वर्षीय प्रभा भरतकुमार आचाटी यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ही शस्त्रक्रिया ‘सर्च’ आणि स्पाईन फाऊंडेशनसाठी मैलाचा दगड ठरली आहे. मुळातच ग्रामीण भागात मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साधनसामग्री व तज्ज्ञ डॉक्टर मिळणे हे एक आव्हान होते. सर्चने ते आव्हान पेलले असून या हॉस्पिटलमधील प्रभा यांची ही मणक्याची ५००वी शस्त्रक्रिया होती.

‘सर्च’ आणि स्पाइन फाऊंडेशनने मणक्यांच्या ५०० शस्त्रक्रियांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे हे महाग आणि सुपरस्पेशॅलिटी प्रकारातील उपचार गडचिरोलीतील गरजू आदिवासी, ग्रामीण रुग्णांना मोफत उपलब्ध झाले आहेत. २००४पासून ‘द’ स्पाइन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शेखर भोजराज यांचा विशेष ओपीडीपासून हा प्रवास सुरू झाला. डॉ. भोजराज यांच्या टीममध्ये डॉ. समीर कलकोटवार, डॉ. रघुप्रसाद वर्मा, डॉ. शीतल मोहिते, डॉ. प्रेमिक नगद, डॉ. गौरीश केंकरे आणि डॉ. अभय नेने अगदी सुरुवातीपासून कार्यरत आहेत. गडचिरोली येथील रहिवाशी असलेल्या प्रभा आचाटी यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, ‘आधी घरातील लहानसहान कामे करताना, चालताना फार त्रास होत असे. ‘सर्च’मध्ये मुंबईतून आलेल्या डॉक्टरांचे मी मनापासून आभार मानते.

‘सर्च’चे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता भलावी यांनी या प्रवासातील टप्पे सांगितले. ‘डॉ. भोजराज हे एक दिवस ‘सर्च’चे संस्थापक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांचे काम पाहाण्यासाठी आले. गडचिरोलीसारख्या नक्षली भागात गावागावात जाऊन डॉ बंग यांचे आरोग्य विषयक काम बघून तसेच तेथील रुग्णांचे सांधे व पाठदुखीचे प्रश्न लक्षात घेऊन डॉ. भोजराज यांनी सुरुवातीला विशेष ओपीडी सुरू केली. यात ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशांवर पुढील महिन्यात शस्त्रक्रियांचे नियोजन केले जात असे.

ग्रामीण भागात मणक्याच्या शस्त्रक्रिया करणे शक्य होईल का, याची सुरुवातीला साशंकता होती, पण गेल्या दोन दशकात ही सेवा ‘सर्च’मध्ये उत्तमरीत्या सुरू आहे. विशेष बाब म्हणजे डॉ. राणी बंग यांच्या पाठीवरील शस्त्रक्रिया डॉ. भोजराज यांनी २०१५मध्ये एका शिबिरात केली होती. २००७ ते जुलै २०२५ या काळात एकूण मणक्याच्या शस्त्रक्रियांचे एकूण ४८ कँप घेण्यात आले आहेत, असे डॉ. भलावी यांनी सांगितले.

डॉ. भोजराज म्हणाले, “५०० शस्त्रक्रिया केल्या असल्या तरी दुसऱ्या बाजूला हजारो रुग्णांवरील शस्त्रक्रिया टाळत औषधांच्या माध्यमातून इलाज केले आहेत. ‘सर्च’मध्ये स्पाईन फाऊंडेशनच्या वतीने मणक्याच्या व्याधींवर उपचार होतात, याची माहिती आता लोकांना झालेली आहे. पुढील टप्प्यात आरोग्यसेवकांना उत्तम प्रशिक्षण देणे आणि मणक्याच्या उपचारांची व्याप्ती वाढवणे, हे आमचे पुढील उद्दिष्ट आहे.

मणक्याशी संबंधित ८० टक्के आजारांत शस्त्रक्रियेची गरज नसते. सामूपदेशन, फिजिओथेरपी, पोश्चर ट्रेनिंग आणि औषधांवर हे रुग्ण बरे होतात. समुदायाच्या पातळीवर उपचार करताना आरोग्य सेवकांची भूमिका महत्त्वाची असते म्हणून योग्य प्रशिक्षण दिले तर ८० टक्के रुग्ण आरोग्यसेवक हाताळतील असेही डॉ भोजराज यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शस्त्रक्रिया टाळण्याकडे कल

‘सर्च’ आणि स्पाइन फाऊंडेशन पाठीच्या कण्याचे उपचार करताना शस्त्रक्रिया टाळल्या जाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. पेन ब्लॉकसाठी इंजेक्शन, औषधे, फिजिओथेरपी यातून रुग्णांवर इलाज करण्याला प्राधान्य दिले जाते. सध्या डॉ. जितेंद्र जैन पेन ब्लॉकचे उपचार देतात. २००७ ते जुलै २०२५ अखेर ३७३ रुग्णांना पेन ब्लॉकचे इंजेक्शन देण्यात आले आहेत. ‘सर्च’मध्ये सेंटर फॉर स्पाईन अँड जॉईंट हेल्थ अंतर्गत फिजिओथेरपी सेंटर, गावपातळीवर सांधे, पाठदुखीसाठी आरोग्य सेवकांच्या वतीने उपचार, मोबाईल फिजिओथेरपी सेंटर, ॲक्वा थेरपी सेंटर, लकवाच्या रुग्णांसाठी न्युरोरिहॅबिलिटेशन सेंटर अशा विविध सुविधा मणका आणि सांधेदुखीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.