मुंबई : मुंबईत मोटार वाहनचालक व सहप्रवासी यांनी सिटबेल्ट लावणे १ नोव्हेंबरपासून बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी आदेश जारी केले. त्यानुसार वाहनांमध्ये सीटबेल्ट बसवून घेण्यासाठी वाहतूक पोलिसांनी १ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर पुढील वा मागील आसनावर बसलेल्या सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट लावला नसेल, तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोटार वाहन (सुधारणा) कायदा, २०१९च्या कलम १९४ (ब) (१) नुसार मोटर वाहन चालकाने सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालविल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच सहप्रवाशांनाही सुरक्ष बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा नसलेल्या मोटार वाहनांमध्ये सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा उपलब्ध करण्यासाठी १ नोव्हेबर,२०२२ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर चालक अथवा सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावता प्रवास केल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघाती मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांनी सुरक्षा बेल्ट लावला नव्हता, अशी बाब तपासात निष्पन्न झाली होती. मुंबईतील रस्ते अपघातांचा अभ्यास करून वाहतूक पोलीस मुंबईत विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचाच हा भाग आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From november 1 seatbelts mandatory driver along co passengers orders issued by traffic police mumbai print news ysh
First published on: 14-10-2022 at 22:05 IST