नाशिक – त्र्यंबकेश्वर दर्शन पथसाठी ६८ कोटी, त्र्यंबकेश्वरमधील नवीन रस्त्यांसाठी सर्वाधिक १८२ कोटी, व्यापारी संकुल, वाहनतळ १५ कोटी आणि सार्वजनिक शौचालयांसाठी १२ कोटी असा तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत २७७ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.
साधारणत: दोन महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वरला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. कुंभमेळ्यासाठी नगरपालिकेने सुमारे १११५ कोटींचा आराखडा तयार केला आहे. यातील सुमारे २७७ कोटींची कामे तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत करण्यावर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली मध्यंतरी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले होते. कोणती कामे तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट झाली, हे बैठकीच्या इतिवृत्तातून पुढे आलेे.
त्र्यंबकेश्वर दर्शन पथ अंतर्गत भाविकांसाठी आच्छादित प्रशस्त दर्शन रांग, हारफुलांसाठी व्यापारी संकुल, दर्शन मंडप, दिव्यांची व्यवस्था आदींचा अंतर्भाव आहे. स्वागत इमारत, परिसर विकासात व्यापारी संकुल, भाजी बाजार व वाहनतळाचा समावेश आहे. सार्वजनिक शौचालयांसाठी १२ कोटींचा निधी मिळणार आहे. त्या अंतर्गत १४ नवीन आणि पाच जुन्या शौचालयांचे नुतनीकरण करण्यात येईल.
दरम्यान, कुंभमेळा आराखड्यात दर्शनपथ, नवीन रस्त्यांचे बांधकाम, घाटांचे नुतनीकरण, स्वागत कमानी उभारणी, सुशोभिकरण, नदी संवर्धन, घनकचरा प्रकल्प उभारणी, त्र्यंबकेश्वर वाढीव पाणी पुरवठा योजना, वाहनतळ उभारणी आदी कामांचा समावेश आहे.
रस्त्यांसाठी सर्वाधिक निधी
तीर्थक्षेत्र विकास योजनेत सर्वाधिक निधी रस्त्यांच्या कामांसाठी मिळाला आहे. जव्हार वळण रस्ता, गोदावरी नदीलगतचा रस्ता, गट क्रमांक १७७ पासून ते गट क्रमांक २०२ पर्यंत २४ मीटर आणि गट क्रमांक १३१ पासून ते गट क्रमांक १३६ पर्यंत १२ मीटर लांबीचे रस्ते तयार केले जाणार आहेत. नव्या रस्त्यांच्या बांधणीसाठी १४१ कोटी आणि भूसंपादनासाठी ४१ कोटी असा १८२ कोटींचा निधी मिळणार आहे.