मुंबई :  नव्वदीच्या दशकात राज्यात गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद निधी अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भास्कर शंकर वाघ व त्याची पत्नी मंगला या दोघांची स्थावर  व जंगम मालमत्ता लवकरच सरकार जमा होणार आहे. तसे आदेश गृह विभागाने काढले आहेत. सुमारे २५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील भास्कर वाघ याच्या मालमत्तेचे मूल्य ११ लाख ३९ हजार इतके आहे.

हेही वाचा >>> सरकार पाडण्यासाठी खोके कोणी पुरवले? धारावी प्रकल्पावरून ठाकरेंचे ‘अदानी समूहा’वर टीकास्त्र 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भास्कर वाघ हा जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचा रोखपाल होता. धनादेशावर कार्यकारी अभियंत्याची सही झाल्यावर तो धनादेशावरील रक्कम वाढवत असे. १९७५ ते ९० दरम्यान या पद्धतीने सुमारे २५ कोटींचा अपहार झाला होता. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांच्या काळात या अपहार समोर आला होता.  या घोटाळयात  ७७ आरोपींविरुद्ध १५ कोटी ८२ लाखांचा अपहार केल्याचे १४ गुन्हे नोंदवले गेले. जन्मठेपेची शिक्षा झालेला भास्कर वाघ अजूनही शिक्षा भोगत आहे. धुळे सत्र न्यायालयाच्या २००३ च्या निकालाविरोधात त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने शिक्षा कायम केली होती. या निकालाविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात २००८ मध्ये दाद मागितली. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्याची शिक्षा कायम केली. खटल्याचा अंतीम निकाल लागेपर्यंत वाघ याची संपत्ती जप्त करणे प्रलंबित होते. वाघ याच्या घरातून  सोन्या चांदीचे दागिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हस्तगत केले होते. १७ लाख ३६ हजार रुपयांच्या दागिन्यांचा ऑक्टोबर महिन्यात लिलाव झाला. १९९० मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपीची मालमत्ता सरकारजमा होण्यास  ३५ वर्षांचा कालावधी लागला.