मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दोन नियमित फेऱ्यांमध्ये ७ लाख २० हजार ६६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर गुरुवारी शिक्षण संचालनालयाने तिसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये १ लाख ११ हजार २३५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये विज्ञान शाखेतून ५६ हजार ७६७ विद्यार्थ्यांना जागा जाहीर झाल्या आहेत.

संपूर्ण राज्यामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरातून एकूण १४ लाख २९ हजार २३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. अकरावीच्या झालेल्या दोन नियमित फेऱ्यांमधून ७ लाख २० हजार ६६६ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयात निश्चित केला. तिसऱ्या नियमित फेरीसाठी विद्यार्थ्यांना २२ ते २३ जुलैदरम्यान नवीन नोंदणी करण्याची संधी दिली होती. या कालावधीत १३ हजार ६२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

तर प्रवेश फेरीसाठी ४ लाख १० हजार ४९८ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरला होता. तसेच ८२ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी कोट्याअंतर्गत अर्जाचा भाग दोन भरला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री तिसरी नियमित फेरी जाहीर करण्यात आली. या फेरीमध्ये १ लाख ११ हजार २३५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५६ हजार ७६७, वाणिज्य शाखेतून ३३ हजार ५०५ आणि कला शाखेतून २० हजार ९६३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना २५ ते २६ जुलै, २०२५ पर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे.

चौथी फेरी २८ जुलैपासून

नियमित चौथी फेरी २८ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे. त्यानुसार २८ ते २९ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, पहिल्या फेरीदरम्यान भरलेल्या भाग-१ मध्ये दुरुस्ती करणे, तसेच अद्ययावत माहिती भरणे, अर्ज-भाग-१ व २ भरणे, कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे, अर्ज १ व २ निश्चित करता येणार आहे. तसेच १ ते २ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११ ऑगस्टपूर्वी महाविद्यालय सुरू होणार

राज्यातील इयत्ता ११ वीचे वर्ग सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या, उच्च माध्यमिक शाळा ११ ऑगस्ट, २०२५ पूर्वी सुरू करणे आवश्यक आहे. तशा सूचना संचालनालयाच्या १९ मे २०२५ रोजीच्या पत्रानुसार सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.