मुंबई : मागील काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारने राज्यातील ११ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कॅथलॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कॅथलॅब सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबईतील गोकुळदास तेजपाल (जी.टी.) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. यामुळे मुंबईतील हृदयविकाराच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
आधुनिक जीवनशैलीमुळे आणि वाढत्या ताणामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे हृदयविकाराचा धोका वाढत असून, मागील काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हृदयविकाराच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच राज्यातील ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये सार्वजनिक – खाजगी भागीदारी तत्वावर कार्डियाक कॅथलॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील जी.टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जे.जे. रुग्णालय आणि केईएम रुग्णालयावर असलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे. जी.टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरू होणाऱ्या कॅथलॅबमुळे दक्षिण मुंबईसह आसपासच्या विभागातील नागरिकांना अधिक चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. या कॅथलॅबमध्ये ॲनेस्थेशिया वर्कस्टेशन, इको यंत्र व एसीटी यंत्र आणि इतर संलग्न उपकरणांचा समावेश असणार आहे.
पीपीपी प्रकल्पाचा कालावधी १५ वर्षांचा असणार आहेत. तसेच शासनाच्या पूर्वमान्यतेने तो कमाल पाच वर्षांपर्यंत वाढविता येणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीमध्ये खासगी सेवा पुरवठादाराकडून कॅथलॅब युनिटसाठी आवश्यक असणारी खरेदी, स्थापना, तसेच सर्व संबंधित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भांडवली गुंतवणूक करण्यात येईल. प्रकल्पासाठी आवश्यक जागा, वीज, पाणी, प्राणवायूचा पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा संबंधित संस्था उपलब्ध करून देईल.
या रुग्णालयांमध्ये सुरू होणार कॅथलॅब
गोकुळदास तेजपाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मुंबई)
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (अंबाजोगाई)
श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (धुळे)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर)
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नांदेड)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (गोंदिया)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मिरज)
आरोग्य पथक (पालघर)
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सातारा)
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (यवतमाळ)
बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (पुणे)
