मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवसाची सुट्टी रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला गणेशोत्सव समितीने विरोध केला आहे. गेल्या ३० वर्षांपासून राज्यात अनंत चतुर्दशीची सुट्टी दिली जात असताना अचानक या दिवशी सुट्टी रद्द केल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्ववत करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
राज्य सरकारने यापूर्वीच्या आदेशानुसार गोपालकालानिमित्त (दहिहंडी) १६ ऑगस्ट रोजी, तर अनंत चतुर्दशीनिमित्त ६ सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली होती. मात्र या दोन्ही सुट्ट्या शनिवारी येत आहेत. राज्यात शनिवारी व रविवारी शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. त्यामुळेच या सुट्ट्या बदलून त्याऐवजी नारळी पौर्णिमा, तसेच ज्येष्ठा गौरी विसर्जनासाठी २ सप्टेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी शहर आणि उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर केल्यामुळे आता अनंत चतुर्दशीला मुंबईतील बॅंका, वित्तीय सेवा, केंद्र सरकरच्या कार्यालयांना सुट्टी लागू नसेल. मात्र या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त देण्यात येणारी सार्वनिक सुट्टी पूर्ववत करावी, अशी मागणी समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले की, अनंत चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी होतात. यात शासकीय, तसेच खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगार व कर्मचारीही सहभागी होतात.
अनंत चतुर्दशीला सुट्टी असल्यास त्यांना या विसर्जन सोहळ्यात सहभागी होता येते. तसेच सुट्टी असली तर मुंबईत वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होईल आणि विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर पार पडेल. यंदा अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबर रोजी असून त्या दिवशी शनिवार असल्याने शासकीय कार्यालये बंद असली तरी खासगी आस्थापने सुरू असतील. मुंबईतील गर्दीचे आणि वाहतुकीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने मागील ३० वर्षांपासून सुरू असलेली अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी पूर्ववत करावी, अशी मागणी ॲड. दहिबावकर यांनी केली आहे.
शिवसेनाप्रमुखांमुळे सुट्टी जाहीर झाली होती मुंबई शहर आणि उपनगरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मुंबईत जवळपास १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यातील बहुतांश मंडळांचा दहा दिवसांचा उत्सव आहे. अनंत चतुर्दशीला मुंबईत गणेश विसर्जनाचा मोठा सोहळा असतो. यात लाखो भाविक सहभागी होतात.
हे लक्षात घेऊन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोस्तव समन्वय समितीने १९९५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे महापालिकेची मैदाने गणेशोत्सवासाठी मिळावीत आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशा दोन मागण्या केल्या होत्या. त्यावेळी राज्यात शिवसेना – भाजप युतीचे सरकार होते. बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना समन्वय समितीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या. शासनाने अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी लागू केली होती, असे ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.