करोनामुळे मंदावलेल्या अर्थचक्राचा फटका गणेशोत्सवानिमित्त सजावट, रोषणाई आदी साहित्यविक्री करणाऱ्या बाजारपेठेला बसला आहे. गणेशोत्सवात चिनी बनावटीच्या विद्युतमाळा, कृत्रिम फुलांचे सजावट साहित्य यांना जोरदार मागणी असते. मात्र यंदा मुंबईसह ठाणे आणि पुण्यात विक्रेते नवे साहित्य मागवण्याऐवजी आपल्याकडील आधीच्याच शिल्लक वस्तूंची विक्री करीत आहेत.

यंदा विक्रीत ८५ टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे क्र ॉफर्ड मार्के टमधील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. एरवी सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी दक्षिण मुंबईतील या बाजारपेठेत झुंबड उडते. त्यामुळे वाट काढणेही कठीण होते. यंदा मात्र लोहार चाळीतील इलेक्ट्रिक साहित्याचा बाजार ग्राहकांविना ओस पडला आहे. कृत्रिम फुले, तोरणे, शोभेच्या प्लास्टिक वस्तू, त्याचबरोबर रंगीबेरंगी विद्युतमाळा, प्रकाशझोत फेकणारे फिरते दिवे आदी साहित्यच बाजारात दिसेनासे झाले आहे. हा बहुतांश माल चिनी बनावटीचा असतो. ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याने व्यापाऱ्यांनी नवीन सजावट साहित्य ठेवण्याऐवजी जुन्याच साहित्याच्या विक्रीवर भर दिला आहे.

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील सलीम शेख यांचे ‘जी. एस. फ्लॉवर्स’ हे प्लास्टिक फुलांच्या विक्रीचे घाऊक दुकान आहे. ‘‘माझ्या दुकानात खरेदीसाठी कर्नाटकातील बेळगाव, गुजरातमधील नवसारी, पुणे येथील दुकानदार येत असत. यंदा टाळेबंदीमुळे ते येऊ शकले नाहीत, असे शेख यांनी सांगितले. किरकोळ बाजारपेठेतही १५ टक्के ग्राहकांचाच प्रतिसाद असल्याची माहिती त्यांनी दिली.  ग्राहकांचा प्रतिसाद कमी झाल्याने यंदा फक्त देशी बनावटीचे काही साहित्य खरेदी केले आहे. त्याव्यतिरिक्त गेल्या वर्षीच्या साहित्याचीच विक्री सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोहार चाळीतील इलेक्ट्रिक वस्तूंच्या बाजारपेठेत चिनी बनावटीचे स्वस्त सजावट साहित्य शिल्लक असल्याने व्यापाऱ्यांनी नवीन साहित्य खरेदी केलेले नाही. ‘‘मागील वर्षी मागविलेले २० टक्के सजावट साहित्य पडून आहे. दुकाने उघडली असली तरी या वर्षी मागणी नाही. त्यामुळे चीनमधून माल मागवला नाही,’’ असे बाँबे इलेक्ट्रिकल या दुकानाचे मालक मुस्तफा बुटावाला यांनी सांगितले. तर या वर्षी १० टक्केच व्यवसाय असल्याची माहिती विजोफा चटईवाला यांनी दिली.

पुण्यात चिनी वस्तूंचे अत्यल्प प्रमाण

करोना प्रादुर्भावामुळे गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेल्या बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमुळे हालचाल दिसू लागली आहे. घरगुती सजावटीच्या साहित्यामध्ये चिनी बनावटीच्या वस्तूंचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आढळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने होत असला, तरी घरगुती गणपतीच्या सजावट साहित्य खरेदीसाठी मंडई, तुळशीबाग, रविवार पेठेतील बोहरी आळी भागात गर्दी होत आहे. बुधवार पेठेतील पासोडय़ा विठोबा मंदिराजवळ असलेल्या विद्युत साहित्य विक्रेत्यांच्या दुकानात गर्दी होत आहे. दर वर्षी गणेशोत्सवाची खरेदी पंधरा दिवस आधीच होते. यंदाच्या उत्सवावर करोनाचे सावट असल्याने बाजारात खरेदीसाठी फारशी गर्दी नाही. पीएमपी बंद असल्याने उपनगरातील तसेच परगावचे ग्राहक खरेदीसाठी तुळशीबागेमध्ये येऊ शकत नसल्याचा फटका बसल्याचे तुळशीबाग व्यापारी संघटनेचे सचिव नितीन पंडित यांनी सांगितले.

थर्माकोलच्या मखरावर बंदी असल्याने सध्या कागदाच्या पुठ्ठय़ांपासून तयार केलेले पर्यावरणपूरक मखर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.  बाजारात शनिवारवाडा, काल्पनिक मंदिर, कमळ आणि विविध आसनांतील मखरे विक्रीसाठी आहेत. टाळेबंदीमध्ये कारागीर गावी गेल्यामुळे मखरांची निर्मिती रोडावली. मात्र, रविवार पेठेसह शहरातील विविध मखर विक्रीच्या दुकानांमध्ये जेमतेम १० टक्के ग्राहक खरेदीला येत आहेत, असे व्यावसायिक अमृत गाला यांनी सांगितले. ग्राहक स्वदेशी बनावटीच्या विद्युतमाळांचा आग्रह धरत आहेत. ज्यांच्याकडे जुने साहित्य आहे, असे विक्रेते ग्राहकांची मागणी असेल, तर चिनी बनावटीच्या माळा देत असले तरी हे प्रमाण अत्यल्प आहे. बाजारपेठांमध्ये १५ ऑगस्टपासून चैतन्य निर्माण झाले आहे. गणेशोत्सवापर्यंत ५० टक्के ग्राहक खरेदीला येतील, असे पन्ना इलेक्ट्रिकल्सचे मिठालाल जैन यांनी सांगितले.

ठाण्यात चिनी वस्तूंना नकार

ठाण्याच्या बाजारपेठांमध्येही नवीन साहित्य विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने विक्रेत्यांनी शिल्लक मालच विक्रीसाठी काढला आहे. त्यात ग्राहकांनी चिनी बनावटीच्या साहित्याकडे पाठ फिरवली असून यंदाच्या गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावट साहित्याच्या मागणीत ७५ टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. चीनमधून पसरलेला करोना आणि सीमारेषेवरील संघर्ष यामुळे ग्राहकांनी चिनी वस्तूंकडे पाठ फिरवल्याचे सांगण्यात येते. यंदा चिनी वस्तूंची आयात न झाल्याने शिल्लक साहित्यच विक्रेत्यांनी चढय़ा किमतीत विक्रीस काढले आहे. काही आकर्षक चिनी बनावटीच्या साहित्याची जागा भारतीय बनावटीच्या वस्तूंनी घेतली आहे; परंतु ती तुलनेने महाग आहेत. चिनी वस्तू नको, तर भारतीय वस्तू महाग यामुळे ग्राहक खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. मागणीत ७५ टक्क्यांनी घट झाली असून विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे राजेश प्रजापती या विक्रेत्याने सांगितले.