टॅक्सीचालकांना रात्री लुटणाऱ्या एका टोळीला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून या टोळीने अनेक ठिकाणी टॅक्सीचालकांना लुटल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा >>>मुंबई: ‘मेट्रो ३’ची आरे कारशेड :‘एमएमआरसी’ची ८४ झाडे हटविण्याची प्रक्रिया अडचणीत?

मरिन ड्राइव्ह परिसरातून कुर्ला येथे जाण्यासाठी मंगळवारी रात्री या टोळीतील साथीदारांनी एक टॅक्सी केली. ही टॅक्सी चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरात येताच आरोपींनी चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल आणि काही रोख रक्कम लुटून पोबारा केला. या आरोपींनी कुर्ला पश्चिम परिसरातून चेंबूर येथे जाण्यासाठी एक टॅक्सी केली. चेंबूर परिसरात येताच या टॅक्सीचालकालाही चाकूचा धाक दाखवून मोबाइल आणि रोख रक्कम लुटून आरोपींनी पळ काढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>>मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच वेतन मिळणार; कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून २०० कोटी रुपये मंजूर

याप्रकरणी दोन्ही टॅक्सी चालकांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अर्जुन भोपारिया, संजय उजरपुरिया, लेखराज लंगनिया आणि एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.