पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील जलवाहतूक सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा, गेट वे ते एलिफंटा सेवा पूर्ववत झाली असून पर्यटक आणि प्रवाशांसाठी ही बाब दिलासादायक ठरली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : तडीपार आरोपीने पोलिसावर केला चाकूने हल्ला

मुंबईजवळील प्रसिध्द पर्यटनस्थळ असलेल्या अलिबागला जाण्यासाठी पर्यटक जल वाहतुकीला पसंती देतात. त्यामुळेच गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा बोटसेवा, तसेच भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यटक मोठ्या संख्येने एलिफंटाला जात असतात. मात्र पावसाळ्यात जलवाहतूक बंद ठेवण्यात येते. त्यानुसार यंदाही १ जून ते ३१ ऑगस्टदरम्यान मुंबईतील प्रवाशी जलवाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता १ सप्टेंबरपासून हळूहळू प्रवासी जलवाहतूक सुरू झाल्याची माहिती मुंबई सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकारी संजय शर्मा यांनी दिली. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा आणि एलिफंटा जलवहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एलिफंटा, अलिबागला जलमार्गे जलद पोहोचणे प्रवाशांना शक्य होणार आहे. ही सेवा बंद असल्याने अलिबागला जाणाऱ्यांना रस्ते मार्गे वेळ खर्च करून जावे लागत होते.

हेही वाचा >>> मुंबई : गौरी-गणेशाला निरोप ; ४८ हजारांहून अधिक गौरी-गणपतींचे विसर्जन

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा आणि एलिफंटा अशी बोटसेवा सुरू झाली आहे. १ सप्टेंबरपासून सहा फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे गेट वे ऑफ इंडिया – मांडवा बोट सेवा चालविणाऱ्या पीएनपी मेरीटाइम सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमधील अधिकाऱ्याने सांगितले.