मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने घाटकोपरमधील चिरानगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला. मात्र अद्याप या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी झोपु प्राधिकरणाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि वास्तुरचनाकाराची नियुक्ती केली. मात्र अद्याप आराखडा तयार झालेला नाही.

तर दुसरीकडे दोन टप्प्यात बांधण्यात येणाऱ्या स्मारकासाठी ६८५ निवासी-अनिवासी बांधकामे हटवावी लागणार आहेत. ही बांधकामे हटविण्याचे आव्हान झोपु प्राधिकरणासमोर आहे. ही बांधकाम हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून येत्या काही दिवसात बांधकामे हटवून भूखंड ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. त्यामुळे स्मारकाच्या कामाला प्रारंभ होण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपु प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपु योजना राबविण्यात येतात. झोपु योजना राबवितानाच सामाजिक दायित्व म्हणून चिरानगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला. चिरानगर झोपडपट्टीत अण्णाभाऊ साठे यांचे घर आहे. या घराचे जतन करण्याचा, घराचा परिसर विकसित करण्यासह स्मारकाची स्वतंत्र ५ मजली इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झोपु प्राधिकरणाने २०२१ मध्ये प्रारुप आराखडा तयार केला. मात्र स्मारकाचे काम काही पुढे गेले नाही. शेवटी नोव्हेंबर २०२४ मध्ये स्मारक मार्गी लावण्याच्यादृष्टीने झोपु प्राधिकरणाने पहिले पाऊल उचलले.

प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी, सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी आणि अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सल्लागार आणि वास्तुरचनाकाराची नियुक्ती करण्याकरीता निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या निविदेद्वारे योगेश धायगुडे कन्सोर्टियम कंपनीची नियुक्ती करण्यात आली. या कंपनीकडून आता प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याच्या प्राथमिक कामांना सुरुवात झाल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे भूखंड १ वर राहत्या घराचे जनत, परिसर विकास केला जाणार असून भूखंड २ वर पाच मजली स्मारकाची इमारत बांधण्यात येणार आहे. मात्र या दोन्ही भूखंडांची जागा अद्याप ताब्यात आली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

भूखंड १ वर २२०निवासी, तर ४० अनिवासी बांधकामे असून भूखंड २ वर ३५० निवासी आणि ७५ अनिवासी बांधकामे आहेत. ही बांधकामे हटवून भूखंड ताब्यात घ्यावे लागणार आहेत. या भूखंडावरील ६८५ बांधकामाचे परिशिष्ट-२ अंतिम झाले आहे. लवकरच ही बांधकामे रिकामी करून भूखंड ताब्यात घेतला जाईल, अशी माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्याचवेळी भूखंडांचे हस्तांतरण करणे आणि आराखडा अंतिम करून निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे असेल स्मारक

प्राचीन लोककला, शाहीरी कला यांची ओळख होण्यासाठी अण्णाभाऊ साठे कक्ष, शाहीर अमर शेख कक्ष, शोषित लढ्यासाठी साक्ष देणारे कक्ष, साहित्य कक्ष, दृकश्राव्य कक्ष, कला-साहित्य कक्ष, ५०० आसनी सभागृह, ३००-२५० आसनी २ चित्रपटगृह, तालीम खोली, प्रशासकीय कार्यालय, उपहारगृह, पुस्तक विक्री दुकाने, भेटवस्तूंची दुकाने, प्रदर्शन कक्ष अशा अनेक सुविधा या स्मारकात असणार आहेत. तसेच प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रही येथे उभारण्यात येणार आहे. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देश या प्रशिक्षण-संशोधन केंद्रामागे आहे.