मुंबई : दोन दिवसांपूर्वी मी मराठीत बोलणार नाही, असे डोळे वटारून सांगणाऱ्या घाटकोपरमधील मुजोर विक्रेत्या महिलेने अखेर माफी मागितली असून मराठीत बोलणार असे तिने सांगितले. तिच्या मग्रुरीची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर घाटकोपरमधील स्थानिक शिवसेनेच्या (ठाकरे) महिला पदाधिकाऱ्यांनी तिला जाब विचारला. त्यानंंतर तिनेही माफी मागितली.
सध्या राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून वाद सुरू आहे. मनसे आणि शिवसेनेने (ठाकरे) या मुद्द्यावरून चांगलेच रण पेटवले आहे. मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांना चोप देऊन धडा शिकवला जात आहे. यामुळे मराठी भाषिक एकवटत असून दुसरीकडे काही हिंदी भाषिक हेतुपरस्सर मराठी भाषकांना डिवचत आहेत. दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथील एका परप्रांतीय विक्रेत्या महिलेची चित्रफित व्हायरल झाली होती. मराठीत बोलणार नाही, हिंदीतच बोलणार असे सांगत होती. ती मराठी भाषकांना उद्देशून हे बोलत होती. यामुळे मराठी भाषिक कमालीचे दुखावले होते.
मात्र या महिलेला शिवसेनेच्या (ठाकरे) स्थानिक महिलांनी मंगळवारी रात्री चांगलाच धडा शिकवला. महिलांनी तिच्या दुकानात जाऊन जाब विचारला. यामुळे ती परप्रांतीय महिला चांगलीच नरमली. तिने माफी मागितली आणि यापुढे मराठीच बोलणार असे सांगितले. महिलांनी तिला ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा देण्यासही सांगितले. यापुढे कुणी असा प्रकार केला तर चांगलीच अद्दल घडवली जाईल, असेही शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांनी सांगितले.
मराठीच्या अवमाना केल्याच्या या महिन्यातील घटना
विक्रोळी
विक्रोळीच्या टागोर नगर मार्केट येथे लकी नावाचे औषध विक्रीचे दुकान आहे. मुळचा राजस्थान येथील असलेल्या दुकानदार प्रेमसिंग देवडा याने व्हॉट्स ॲप स्टेटसवर मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. त्यामुळे परिसरात संताप पसरला होता. त्याची माहिती स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याच्या दुकानात जाऊन त्याला जाब विचारला आणि मारहाण करून माफी मागायला लावली. यानंतर त्याची बाजारातून धींडही काढण्यात आली. मराठीचा द्वेष करणाऱ्या या दुकानदाराच्या दुकानातून कुणीही सामान खरेदी करू नका असे आवाहनही कार्यकर्त्यांनी यावेळी केले.
विरार
विरारमध्ये राजू पटवा या रिक्षाचालकाने एक महिलेशी असभ्य वर्तन करून तिच्या भावाला मारहाण केली होती. यावेळी पटवा याने मग्रुरी दाखवत मराठी भाषेत बोलणार नाही असे सांगत मराठी बद्दल आणि महाराष्ट्राबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. एक आठवड्यानंतर स्थानिक शिवसैनिक आणि मनसैनिकांनी त्याला शोधून काढले आणि भर रस्त्यात त्याला चोप देत माफी मागायला लावली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा रोड
मिरा रोड येथील जोधपूर स्वीट या मिठाई विक्रेत्याने मराठी भाषेबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले होते. या घटनेनंतर मिरा रोडच्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून सर्व मराठी भाषिकांनी एकत्रित मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मिरा रोडमध्ये जाहीर सभा घेत मराठीचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.