मुंबई : प्रसिद्ध गझल गायक दिवंगत पंकज उधास यांनी २४ वर्षांपूर्वी ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए) आणि ‘पेरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट’ (पीएटीयुटी) या संस्थांबरोबर मिळून सुरू केलेला ‘खजाना-फेस्टिव्हल ऑफ गझल्स २०२५’ हा गझल महोत्सव यंदा १८ व १९ जुलै रोजी ट्रायडंट येथे ट्रायडंट येथे होणार आहे.
थॅलेसेमियाने ग्रस्त मुले आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी निधी संकलित करण्यात येतो. या महोत्सवाचे यंदाचे पर्व प्रख्यात पार्श्वगायक दिवंगत मोहोम्मद रफी यांना त्यांच्या जन्मशताब्दीच्याऔचित्याने समर्पित करण्यात आले आहे. त्यांचे संगीत विश्वातील योगदान अतुलनीय असून त्यांना महोत्सवाच्या माध्यमातून अभिवादन केले जाणार आहे.
या महोत्सवात देशातील आघाडीचे गझल कलाकार सहभागी होणार आहेत. त्यात अनुप जलोटा, तलत अझीझ, रेखा भारद्वाज, सुदीप बॅनर्जी, उस्मान मीर, अमीर मीर, पंडित अजय पोहनकर, अभिजित पोहनकर, महालक्ष्मी अय्यर, प्रतिभा सिंग बघेल, बर्नली चट्टोपाध्याय, कल्पना गंधर्व आणि हिमांशू शर्मा यांचा समावेश आहे.या महोत्सवात जगप्रसिद्ध तबला वादक दिवंगत झाकीर हुसेन यांनाही आदरांजली अर्पण केली जाणार आहे. राकेश चौरसिया, शिखर नाद कुरेशी, संजय दास आणि ओजस अधिया हे वादन करून झाकीर हुसेन यांना अभिवादन करतील. ‘खजाना गझल टॅलेंट हंट २०२५’ या स्पर्धेतील विजेते सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका झोमॅटोवर उपलब्ध आहेत.