मुंबई- लालबागचा राजा मंडळाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर झोपलेल्या दोन लहान मुलींना भरधाव वेगात धावणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात २ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर ११ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. शनिवारी पहाटे गजबजलेल्या ठिकाणी हा अपघात घडला. सीसीटीव्हीच्या आधारे काळाचौकी पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

परळ येथील लालबाग राजा प्रसिध्द गणपती आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी असते. शनिवारी मुंबईत विघ्नहर्त्याला निरोप देण्याची लगबग सुरू होती. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते. त्यावेळी लालबागच राजाच्या मुख्य प्रवेशद्वासमोरील रस्त्यावर भीषण अपघात झाला.

असा घझाला अपघात

याबाबत माहिती देताना काळाचौकी पोलिसांनी सांगितले की, लालबाग राजाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी विविध प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर शुक्रवारी रात्री एक कुटुंब झोपले होते. शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास एक अज्ञात वाहनाने झोपलेल्या दोन लहान मुलांना जोरदार घडक दिली. त्यात चंद्रा मुजुमदार या २ वर्षांची लहान मुलगी आणि तिचा ११ वर्षांचा भाऊ शैलू मुझुमदार जखमी झाला. स्थानिकांनी दोघांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले. परंतु गंभीर जखमी असलेल्या चंद्राचा मृत्यू झाला. शैलू गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

शनिवारी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस होता. लालबागच्या राजाला पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमली होती. त्यातच पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. तरी हा अपघात झाला आणि ट्रकचालक पळून गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या अपघाता प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही सीसी टीव्ही चित्रण तपासले असून लवकरच वाहन चालकाला अटक केली जाईल, असे काळाचौकी पोलिसांनी सांगितले.