मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) ही देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक मिळविणार असून जगभरातील नामांकित बड्या कंपन्यांनी या संस्थेला सहकार्य करण्यास तयारी दाखविली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी येथे ‘वेव्हज’ परिषदेत केले.

आयआयसीटीला सहकार्य करण्यासाठी गुगल, यूट्यूब, जिओ स्टार, अॅडोव, मेटा, वाकॉम, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीआयडीआयए यासारख्या जगभरातील बड्या कंपन्यांचा समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि चित्रपट (एव्हीजीसी-एक्सआर) क्षेत्रासाठी समर्पित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) या एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. आयआयसीटी या क्षेत्रासाठी एक मोठी शैक्षणिक पायाभूत सुविधा बनेल.

तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आयआयटी आणि आयआयएम देशात व जगभरात मापदंड बनल्या आहेत. त्यांच्या निकषांचे पालन करण्यात येणार असून आयआयसीटी ही जागतिक दर्जाची संस्था होईल, असा विश्वास वैष्णव यांनी परिषदेत व्यक्त केला.

या समारंभास उपस्थित असलेल्या उद्याोजकांमध्ये रिचर्ड केरिस, (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक मीडिया अँड एंटरटेनमेंट, एनव्हीडिया), संजोग गुप्ता (सीईओ, स्पोर्ट्स अँड लाईव्ह एक्सपिरीयन्सेस, जिओ स्टार), माला शर्मा (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक – एज्युकेशन, अॅडोब), प्रीती लोबाना (कंट्री हेड आणि उपाध्यक्ष, गुगल इंडिया), राजीव मलिक (वरिष्ठ संचालक, वॅकॉम), संदीप बांदीबेकर (सेल्स प्रमुख, राज्य सरकार आणि आरोग्यसेवा), संदीप बांदीवडेकर (संचालक, मेनस्ट्रीम सर्व्हिसेस पार्टनर्स, मायक्रोसॉफ्ट) आणि सुनील अब्राहम (संचालक, सार्वजनिक धोरण, मेटा) यांचा समावेश होता. त्याचबरोबर आयआयसीटीचे संचालक मंडळाचे सदस्य आणि नियामक परिषदेचे सदस्य आशिष कुलकर्णी, बिरेन घोष, मानवेंद्र शुकुल, मुंजाल श्रॉफ, चैतन्य चिंचलीकर आणि सुभाष सप्रू आदी यावेळी उपस्थित होते.

चित्रपट, मनोरंजन विश्वात नवोपक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपट आणि मनोरंजन विश्वात पूर्णपणे नवीन असा हा उपक्रम शासनाने सुरू केला आहे. हा उपक्रम माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला अग्रेसर बनवू शकतो. जगभरातील आघाडीच्या कंपन्यांनी आयआयसीटीबरोबर अभ्यासक्रम विकास, इंटर्नशिप, शिष्यवृत्ती, स्टार्टअपना निधीपुरवठा आणि नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी भागीदारी करण्यास सहमती दर्शवल्याचे वैष्णव यांनी यावेळी सांगितले.