‘एरिअल फोटोग्राफी’ अर्थात हवाई छायाचित्रणासाठी प्रसिद्ध असलेले देशातील ख्यातनाम छायाचित्रकार गोपाळ बोधे यांचे नैनिताल येथे निधन झाले . छायाचित्रणासाठी जिम कॉर्बेट अभयारण्यात गेले असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना तातडीने नैनिताल येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादम्यानच गोपाळ बोधे यांची प्राणज्योत मालवली.
सांगली शहरातून आलेले गोपाळ बोधे गेली अनेक वर्षे व्यावसायिक दर्जाचे छायाचित्रकार म्हणून काम करत आहेत. आजवर त्यांनी हेलिकॉप्टरमधून टिपलेली देशभरातील दीपगृहे, मुंबईची मनोहारी दृश्ये, महाराष्ट्रातील गड-किल्ले यांचे संकलन आकर्षक कॉफी टेबल पुस्तकांमध्ये बंद झाली आहेत. मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिराचे सौंदर्य त्यांनी वेगवेगळ्या कोनातून टिपून पुस्तकातून सादर केले होते.
‘एरिअल’ आणि ‘इन्फ्रा रेड फोटोग्राफी’ या फोटोग्राफीतल्या अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणाºया शाखांमध्ये बोधे ‘मास्टर’ समजले जाताता. शिवाय भारतात या प्रकारची फोटोग्राफी रुजवण्याचं काम त्यांनी केलं असून त्याचा पाया घातला.ऐकण्यापेक्षा पाहिलेलं कधीही पटकन लक्षात राहतं व समजतं. बोधे यांनी आनंदासाठी फोटोग्राफी केली परंतु ते इथेच थांबले नाहीत. एखाद्या भागाचे ‘टोपोग्राफिक डॉक्युमेण्टेशन’ करण्यासाठी त्यांनी या तंत्राचा वापर केला. समाजाला त्या भागाची वेगवेगळ्या दृष्टिकोनातून माहिती मिळावी, त्याचे महत्त्व समजावे व पर्यावरण, परिसंस्था यांचं महत्त्व लक्षात यावं हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश.
जंगलांची घनता, लोकसंख्येची घनता, पाण्याची खोली इत्यादी वैज्ञानिक गोष्टींचा शोध घेण्यासाठी ‘इन्फ्रारेड फोटोग्राफी’चा वापर केला. नुकताच सिंधू नदीच्या खोऱ्यातील पर्वत व तळी इत्यादीचे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी लडाखमध्ये फोटोग्राफी केली आहे. तसेच गेल्या १२ वर्षांपेक्षा जास्त काळ ते भारतीय नौदलाच्या ‘नेव्ही डे’च्या प्रदर्शनाचे को-आॅर्डिनेशन करत आहेत. नेव्हीचे अधिकारी, खलाशी आणि नागरिक यांसाठी त्यांनी ‘नेचर क्लब’ची स्थापना केली आहे. वर्कशॉप्स व व्याख्यानमाला या माध्यमांतून लोकांना वाइल्डलाइफ व नैसर्गिक संपत्ती यांची माहिती देतात.