मुंबईकरांची सकाळ झाली तीच मुळी मुंडे यांच्या निधनाच्या बातमीने. रेल्वे असो वा बस, टॅक्सी असो वा रिक्षा, बस स्टॉप असो वा कार्यालये सर्वत्र एकच चर्चा होती ती मुंडेंच्या अकाली एक्झिटची! भाजपच्या प्रदेश कार्यालयात तर अनेकांना अश्रू आवरणेही कठीण झाले होते. सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती.
हवाई दलाच्या विशेष विमानाने मुंडे यांचे पार्थिव सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर पार्थिव वरळी येथील पूर्णा या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फी मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची तोबा गर्दी उसळली होती. हजारो कार्यकर्त्यांचा इतका वेळ आवरून धरलेला भावनेचा बांध फुटला. लाडक्या साहेबांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना इमारतीच्या बाहेरच रोखले. सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी मुंडे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी मुंडे यांचे अंत्यदर्शन घेतले. ‘पूर्णा’कडे जाणारे सर्व कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे या रस्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मुंडेंच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी संपता संपेना. अखेर रात्री उशिरा त्यांचे पार्थिव नरिमन पॉईंट येथील पक्षाच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असता शोकाकुल अवस्थेतील हजारो नागरिकांनी रांगा लावल्या. मुंडे यांच्या मृत्यूच्या दु:खाने सुरू झालेला ३ जूनचा दिवस या दु:खाच्या पाऊलखुणा कायम ठेवूनच मावळला..
दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.