मुंबई : ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ हा साहित्य, संगीत, नाट्य आणि विविध कलांचा भव्य गौरवोत्सव पहिल्यांदाच साजरा होत आहे. या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना कला संस्कृतीच्या नव्या जुन्या प्रवाहांचे दर्शन होणार आहे. यात विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून नाट्य प्रयोगांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. यात काही गाजलेल्या नाटकांसह काही अभिनव नाटकांचे प्रयोग खास ‘लिटफेस्ट’च्या मंचावर होणार आहेत.

अभिजात साहित्य, कलासंस्कृतीचा नव्या जाणीवनेणिवेतून वेध, वैचारिक चर्चासत्रे, सांगीतिक मैफल यांसारखे विविध कार्यक्रम हे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे वैशिष्ट्य आहे. याच वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचा भाग म्हणून काही निवडक नाटकांच्या विशेष प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दास्तान-ए-रामजी’ हा एकल कथा आणि तद्नुषंगिक अभंगांचे मिश्रण असलेला विशेष प्रयोग यावेळी अक्षय शिंपी सादर करणार आहेत. यात मराठीतील प्रसिद्ध लेखक दि. बा. मोकाशी यांची गाजलेली लघुकथा ‘आता आमोद सुनासी आले’ ही ‘दास्तानगोई’ कलेच्या माध्यमातून समोर येते. हा प्रयोग २ नोव्हेंबर रोजी पु.ल. देशपांडे सभागृह, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे दुपारी १:३० ते ३ या वेळेत सादर होणार आहे.

नव्वदच्या दशकात गाजलेले ‘ऑल दि बेस्ट’ नाटक लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनी गेल्यावर्षी पुन्हा रंगमंचावर आणले आहे. नव्या कलाकारांच्या संचातील या नाटकानेही आत्तापर्यंत २२५ प्रयोग पूर्ण केले आहेत. आंधळा, मुका आणि बहिरा या तीन मित्रांच्या गंमतीजमती आणि प्रेम अशा कथेतून हे नाटक साकारत जाते.

अभिनेता निखिल चव्हाण, मयूरेश पेम आणि मनमीत पेम यांच्या या नाटकात महत्त्वाच्या भूमिका आहेत. मूळ ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक १९९३ मध्ये रंगमंचावर आले होते. त्यानंतर वेगवेगळ्या कलाकारांच्या संचात या नाटकाचे आत्तापर्यंत ४,९७५ प्रयोग झाले आहेत. ५ हजार प्रयोगांच्या विक्रमी टप्प्यावर असणाऱ्या या नाटकाचा विशेष प्रयोग मुख्य सभागृह, रवींद्र नाट्यमंदिर येथे २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५:३० या वेळेत होणार आहे. यावेळी काही भाग्यवान निवडक प्रेक्षकांना या प्रयोगाच्या ठिकाणीच ‘ऑल द बेस्ट’ या नाटकातील काही प्रसंगांचे मंचावर सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

तरुण कथाकारांचे अभिवाचन

मुंबई : राज्याच्या विविध भागांतून तिथल्या मातीतल्या गोष्टी, भाषेचा लहेजा घेऊन कथा-कादंबरी, चित्रपट, नाटक, रॅप संगीत अशा विविध माध्यमांतून लोकांसमोर आणणारे अनेक तरुण कथाकार आज लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आशयाला माध्यमाचे बंधन नसते, हे या तरुण लेखकांकडे पाहून लक्षात येते. लेखक, सिनेमॅटोग्राफर अशी बहुआयामी ओळख असलेले वसिमबारी मणेर आणि रॅप आर्टिस्ट, परफॉर्मर अशी ओळख असलेला सुजय जाधव यांच्या कथांच्या अभिवाचनाचा वेगळाच प्रयोग ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर रंगणार आहे.

चित्रकार आणि लेखक असणारे वसिमबारी मणेर हे गेल्या दशकापासून कथा साहित्यात झळकणारे नाव. माणदेशातल्या कोरडवाहू भागात वाढलेल्या बारी यांच्यावर लेखनाचे आणि कलेचे संस्कार झाले ते डॉ. मॅक्सिन बर्नसन आणि डॉ. मंजिरी निंबाळकर यांनी काढलेल्या प्रयोगशील शाळेत. त्यांनी फलटणमध्ये ‘दवात ए दक्कन’ उभारून मुलांसाठी म्हणून पुस्तके लिहिली. चित्र, लेखन, माहितीपट, निवेदन, चित्रपट छायाचित्रण अशी मुशाफिरी करणारे वसिमबारी त्यांच्याच कथेचे अभिवाचन या वेळी करणार आहेत. तर ‘तोडी मिल फँटसी’ या मुंबईवरच्या आधुनिक संगीत नाटकाचे कर्तेधर्ते सुजय जाधव हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

रॅप आर्टिस्ट आणि परफॉर्मर अशी ओळख असणारे जाधव हे कथालेखनातून अभिव्यक्त होत असतात. त्यांचा ‘जिब्रिश कथा’ नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. कलेच्या प्रांतात मुक्त संचार करणाऱ्या आणि आजच्या काळाचे संवेदन मांडणारे हे दोन तरुण लेखक ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर अभिवाचनाच्या प्रयोगातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. हा कार्यक्रम पु. ल. देशपांडे सभागृह, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत होणार आहे.

लोकसत्ता अभिजात लिटफेस्टच्या निमित्ताने चित्रप्रदर्शन

मुंबई : मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या अभिनव कार्यक्रमातंर्गत अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. याच विशेष कार्यक्रमांचा भाग म्हणून चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’तून आपल्या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रांच्या माध्यमातून वाचकांना भेटणारे प्रसिद्ध व्यंगचित्रकार, सुलेखनकार नीलेश जाधव यांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहण्याची संधी रसिकांना ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या निमित्ताने मिळणार आहे.

विविध कलांचा गौरवोत्सव ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या अनोख्या कार्यक्रमातून साजरा होणार आहे. साहित्य, काव्य, संगीत आणि नाट्य यांसह अनेक कार्य्रक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. यासोबतच कविता, लेखन आणि लहान मुलांसाठी चित्रकला कार्यशाळांतून इच्छुकांना मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अशाच वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचा एक भाग म्हणून ‘लोकसत्ता’चे प्रसिद्ध चित्रकार नीलेश जाधव यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नीलेश जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’, ‘चतुरंग’ या पुरवण्यांसह, विशेष लेख, लहान मुलांसाठीच्या गोष्टी अशा विविध माध्यमातून चित्ररूपाने आपल्याला भेटत असतात. व्यक्तीचित्र, व्यंगचित्र, रेखाचित्र यांसह सुलेखन अशा विविध प्रकारे ते आपल्या खास शैलीत व्यक्त होतात. एखाद्या लेखाला ज्याप्रमाणे सुयोग्य शीर्षकाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे लेखाच्या विषयानुरुप असणारे चित्र हे त्या लेखाची मांडणी अधिक वैशिष्ट्यपूर्ण करत असते. या पलीकडे असणारी त्यांची अशीच वैविध्यपूर्ण चित्रभाषा या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनुभवण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. हे चित्रप्रदर्शन आर्ट गॅलरी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे १ आणि २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पाहता येईल.