शालेय वयात मुलांच्या जडणघडणीत आजी, आजोबांची महत्त्वाची भूमिका असते. मुलांच्या आणि आजी, आजोबांच्या नात्याला बळकटी देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी, आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आजी, आजोबा दिवस रविवार, १० सप्टेंबर रोजी असून त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच शाळास्तरावर या दिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. काही कारणास्तव शाळेला सदर कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही, तर शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस साजरा करावा, असे शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>मुंबई: अनामत रक्कमेसह सर्वात आधी येणाऱयास थेट घर
सध्याची कौटुंबिक स्थिती पाहता अनेक आई-वडील नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बराच वेळ घराबाहेर असतात. त्यादरम्यान पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी, आजोबांवर असते. त्यामुळे मुलांवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आजी, आजोबांवर असते. त्यामुळे आजी, आजोबांशी असलेल्या या घट्ट नात्याची ओळख होणे पाल्यांच्या सर्वांगिण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी असते. त्यामुळे शाळांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ, गप्पागोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे आयोजन करणे गरजेचे असल्याचेही परिपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा >>>पोटनिवडणुकीसाठी आघाडीत एकीचे प्रयत्न; कसबा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा
आजी, आजोबांकरिता सदर दिवशी राबविण्यात येणारे कार्यक्रम
विद्यार्थ्यांनी आपल्या आजी, आजोबांचा परिचय करून देणे.
आजी, आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करणे.
विटी-दांडू, संगीत खुर्चीसारख्या खेळांमधून बालपणीच्या आठवणींना उजाळा देणे.
पारंपरिक वेषभूषेमध्ये आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करणे. ( ऐच्छिक )
महिलांसाठी मेहंदी तसेच इतर उपक्रमांचे आयोजन
आजीच्या बटव्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगणे. तसेच झाडे लावणे व पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे.