मुंबई : बदलत्या जीवनशैलीनुसार मधुमेह, कॉलेस्टेरॉल, संधिवात, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा यासारखे ‘चयापचय’ संबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी आयुष मंत्रालयाने चयापचय विकारांच्या उपचाराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यामध्ये निरोगी आहार पद्धती आणि जीवनशैलीतील बदल, व्यायाम, योग, औषधांचे नियमित सेवन करणे आदींवर भर देण्यात आला आहे.

आयुष मंत्रालयाद्वारे गुरुवारी लोणावळा येथे दोन दिवसीय ‘राष्ट्रीय आयुष मिशन कॉनक्लेव २०२५’ ला सुरुवात झाली. या वेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुष मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पुस्तिकेचे अनावरण केले. या कार्यक्रमाला राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, मिझोराम, छत्तीसगढ, सिक्किम येथील आरोग्य व आयुष्य मंत्रालयाचे मंत्री उपस्थित होते.मार्गदर्शक तत्त्वांमध्ये चिकित्सा, निदान, संदर्भ, आहार, सल्ला आणि योग यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना कोणत्या पद्धतींचा अवलंब करायचा, तसेच रुग्णांवर कशा प्रकारे उपचार करायचे याची माहिती देण्यात आली आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्धा आणि ॲलोपॅथीमधील डॉक्टरांसाठी काही मुद्दे निश्चित करण्यात आले आहेत.

आयुष पद्धतीमध्ये आहार, जीवनशैली, व्यायाम व योग यांच्यासंदर्भात शिफारशी केल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी जवळपास १० महिन्यांचा कालावधी लागला. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचा समावेश होता. ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व चिकित्सा पद्धतींसाठी दिशादर्शक असल्याचे आयुष मंत्रालयाचे उप महाव्यवस्थापक डॉ. ए. रघु यांनी सांगितले.

महाराष्ट्रात ३८७ आरोग्य मंदिरे सुरू

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी या वेळी उपचाराबाबतीत सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच आयुष उपचार पद्धती घराघरामध्ये पोहचली पाहिजे यासाठी लोकांचा त्यावर विश्वास निर्माण करण्याच्या सूचना दिल्या. आयुष उपचार पद्धती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आयुष आरोग्य मंदिरांची स्थापना करण्यावर भर देण्यात येत असून, आतापर्यंत १२ हजार ५०० मंदिरांची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ३८७ आरोग्य मंदिर सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूचना काय?

नियमित आहारामध्ये कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ, फळे, काजू, पालेभाज्या, फायबरला प्राधान्य द्यावे. डाळी, शेंगा, प्रक्रिया न केलेल्या भाज्या आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा. अधूनमधून उपवास केल्यास वजन कमी होते. साखरेचे सेवन दररोज ६ चमचेपर्यंत कमी करावे. मिठाचे सेवन दिवसाला ५ ग्रॅमपर्यंत मर्यादित करावे, कृत्रिम गोड पदार्थ टाळावे, मद्यपान व धूम्रपान बंद करणे, दररोज ३० मिनिटे पोहणे, चालणे, सायकलिंग, धावणे, जॉगिंग आणि रोइंग असे व्यायाम करावेत. दररोज किमान ५००० पावले चालण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.