scorecardresearch

मुंबईतील गुटखा तस्करीचे धागेदोरे अंडरवर्ल्डकडे?, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तपास

गेल्या अनेक वर्षांपासून यांत सक्रिय असून सरकारने गुटख्यावर बंदी घातल्यामुळे त्याच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे.

police seized gutkha
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबईः मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गेल्या आठड्यात डोंगरी परिसरात कारवाई करून गुटखा तस्करीशी संबंधित टोळीला अटक केली असून या तस्करीचे धागेदोरे अंडरवर्ल्डशी (अधोविश्व) जुळल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आल्याचे  अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गुरुवारी डोंगरी येथील उमरखाडी आणि डोंगरी परिसरातील न्यू बंगालीपुरा येथील सदनिकांवर छापा टाकून बंदी असलेला गुटखा, पान मसाला आणि तंबाखूचा ३० हजार ३०० रुपये किंमतीचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी अबू सलीम खान, फहीम खान, अबुलश शेख, शारिक अझीम खान, मोहम्मद उमर खान, मोहम्मद फरहान अब्दुल बटाटेवाला आणि अझीम इस्माईल खान या सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी डोंगरी परिसरातील आणखी पाच ते सहा गोदामांवर छापे मारले, तेथून सुमारे ४५ लाख रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला आणि तंबाखू जप्त करण्यात आला होता.

हेही वाचा >>> बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार

गेल्या अनेक वर्षांपासून यांत सक्रिय असून सरकारने गुटख्यावर बंदी घातल्यामुळे त्याच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे आता गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधून गुटखा आणत असल्याचे या गोदामांचे मालक अबू सलीम खान आणि अझीम इस्माईल खान यांनी चौकशीदरम्यान सांगितले. आसिफ माझगाव, सनी ठाकूर, वकार भिवंडीवाला हे घाऊक दराने गुटख्याचा पुरवठा करीत होते. ते उमरखाडी जवळच्या गोदामात आणि डोंगरी येथील ट्रान्झिट कॅम्प रूबी इमारतीमध्ये गुटख्याचा साठा करीत होते. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३२८,२७३, १९९ तसेच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी केवळ मोहरे असून त्यांच्या आडून परदेशातील हस्तक तस्करीत सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे.

हेही वाचा >>> मुंबई : उपनगरवासियांना पाण्यासाठी सायंकाळी ६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार

त्या व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याचा संशय असल्यामुळे याप्रकरणाचा तपास आता खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य आरोपी अबू खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर डोंगरी पोलीस ठाण्यात गुटखा तस्करीचे १८ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आणखी दोन आरोपी अझीम खान आणि फरहान बटाटेवाला यांनाही गुटखा तस्करीच्या गुन्ह्यात जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली होती. ही टोळी आसपासच्या परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये बंदी घातलेल्या उत्पादनांचा पुरवठा करीत आहेत. याप्रकरणातील आरोपी अबू खानला याच्याविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही तो परदेशातील हस्तकांच्या मदतीने गुटखा तस्करीत सक्रिय आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 11:16 IST
ताज्या बातम्या