देशविदेशात प्रसिद्ध असलेली नाशिकची द्राक्षे यंदा गारपिटीच्या तडाख्यात सापडल्यामुळे यंदाच्या हंगामात खवय्यांसाठी ती आंबटच राहण्याची चिन्हे आहेत. गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्यात जवळपास २० टक्के द्राक्ष बागांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. यामुळे द्राक्षाच्या एकूण उत्पादनात कमालीची घट होऊन नेहमीच्या तुलनेत त्यांचे भावही वधारणार आहेत. नैसर्गिक आपत्तीचा परिणाम निर्यातीवर होईल, असे चित्र आहे.
सलग दोन दिवस गारांसह झालेल्या पावसाने जिल्ह्य़ातील जवळपास २५ ते ३० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा अंदाज आहे. त्यात अधिक्याने द्राक्ष बागांचे नुकसान झाले. देशातील एकूण द्राक्ष उत्पादनात निम्मा वाटा राखणारी नाशिकची द्राक्षे निर्यातीत ७० टक्के हिस्सा काबीज करतात. ज्या भागात निर्यातक्षम दर्जाची द्राक्ष होतात, त्या निफाड, िदडोरी व चांदवड तालुक्यात हजारो एकरवरील बागा एकतर भुईसपाट झाल्या अन्यथा ५० टक्क्यांहून अधिक बाधीत झाल्या आहेत. त्यातच, ज्या भागात केवळ अवकाळी पाऊस झाला अथवा ढगाळ हवामानामुळे बागांवर डावणी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. या एकंदर स्थितीमुळे उत्पादनात लक्षणीय घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. द्राक्ष बागेची उभारणी आणि संगोपन हे अतिशय खर्चीक काम आहे. निर्यातक्षम द्राक्षांच्या जपणुकीसाठी कर्ज काढावे लागते. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे एका झटक्यात होत्याचे नव्हते झाले आहे.
जिल्ह्य़ात सुमारे एक लाख ६० हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. याद्वारे दरवर्षी एक लाख ६० हजार मेट्रिक टन द्राक्ष उत्पादित होतात. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ३० हजार एकरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले. पण पुढील काही दिवसात रोगराईचा प्रादुर्भाव लक्षात घेता या क्षेत्रात आणखी वाढू होऊ शकते, याकडे द्राक्ष उत्पादक संघाचे विभागीय अध्यक्ष कैलास भोसले व पदाधिकारी जगन्नाथ खापरे यांनी लक्ष वेधले.

निर्यातीवरही परिणाम
भारतातून गतवर्षी एक लाख ९२ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यामध्ये युरोपात ६५ हजार, रशिया २४ हजार मेट्रीक टन तर उर्वरित द्राक्ष जगातील इतर राष्ट्रांत पाठविण्यात आली. देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्षांच्या उत्पादनात घट होणार असल्यामुळे यंदा निर्यातीवर त्याचा विपरित परिणाम होईल, असे द्राक्ष उत्पादक संघाचे माजी विभागीय अध्यक्ष विजय गडाख यांनी सांगितले.

‘अंगूर की बेटी’ रुसणार
वाइनसाठी लागणाऱ्या द्राक्षांचे क्षेत्र जिल्ह्यत साडेतीन हजार एकर आहे. ज्या विशिष्ट भागात गारपिटीचा तडाखा बसला, तेथील वाइनच्या द्राक्षांचेही नुकसान झाले आहे. पण, द्राक्षांच्या तुलनेत वाइनच्या द्राक्षांच्या नुकसानीचे प्रमाण कमी राहील. कारण, त्यावर डाग पडले तरी वाइन निर्मितीसाठी ते वापरता येतात. सध्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे, असे भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळाचे डॉ. नीरज अग्रवाल म्हणाले.