शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधींसंबंधी केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ निर्माण झाला असताना हाजी मस्तानचा दत्तक पुत्र सुंदर शेखऱ यांनी वक्तव्याला दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी हाजी मस्तान आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चांगले मित्र होते असा दावाही केला आहे. इंदिरा गांधी या करीम लाला आणि हाजी मस्तान यांना भेटत असत, ही बाब मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे असाही दावा त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुंदर शेखर यांनी सांगितल्यानुसार, “शिवसेना नेते संजय राऊत जे बोलले आहेत ते योग्य आहे. इंदिरा गांधी करीम लाला याला भेटत असत. याशिवायही अनेक नेते भेटत असत. हाजी मस्तान एक व्यवसायिक होता. बाळासाहेब ठाकरेदेखील हाजी मस्तानचे चांगले मित्र होते”.

दुसरीकडे करीम लाला याच्या नातवानेही संजय राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. आपल्या कार्यालयात इंदिरा गांधी आणि करीम लाला यांची भेट झाल्याचा फोटो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील करीम लाला याची भेट घ्यायचे असाही दावा त्यांनी केला.

“मुंबईचा पोलीस आयुक्त कोण होणार ? तसंच मंत्रालयात कोण बसणार ? हे अंडरवर्ल्ड ठरवत असे. जेव्हा हाजी मस्तान मंत्रालयात येत असे तेव्हा अख्खं मंत्रालय खाली येत असे. इंदिरा गांधीही पायधुनी येथे करीम लालाला भेटण्यासाठी आल्या होत्या,” असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा – संजय राऊतांची अशी वक्तव्यं खपवून घेणार नाही – काँग्रेस

काँग्रेसने संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली होती. अशी वक्तव्यं यापुढे कुणाकडूनही खपवून घेतली जाणार नाहीत असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. काँग्रेसच्या नेत्यांकडून जाहीरपण निषेध सुरु झाल्यानंतर संजय राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. आपल्या मनात इंदिरा गांधी यांच्याबद्दल आदरच आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांना इंदिराजी समजल्याच नाहीत, हे दुर्दैव असल्याचे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. राऊत यांच्या फटकेबाजीमुळे शिवसेनेची मात्र पंचाईत झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haji mastan sundar shekhar shivsena balasaheb thackeray sanjay raut indira gandhi karim lala sgy
First published on: 17-01-2020 at 13:17 IST