मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग प्रकल्पामुळे बाधित होण्याची शक्यता असलेले वरळी आणि हाजीअली समुद्रकिनाऱ्याजवळील प्रवाळांचे दोन वर्षांपूर्वी कुलाब्यातील नेव्ही नगर परिसरात स्थलांतर करण्यात आले होते. मात्र सध्या हाजीअली परिसरात सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून याच परिसरात समुद्रकिनाऱ्यालगत प्रवाळांचे दर्शन घडले आहे.

दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच नरिमन पॉईंट येथून थेट पश्चिम उपनगरात  जलदगतीने पोहोचता यावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने  सागरी किनारा मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पातील मरिन ड्राईव्ह ते वरळी-वांद्रे सागरीसेतूपर्यंतच्या किनारा मार्गाच्या उभारणीचे काम मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे वरळी आणि हाजीअली समुद्रकिनाऱ्यालगतच्या समुद्र प्रवाळांचे अस्तित्व धोक्यात आले होते. या प्रवाळांचे संवर्धन व्हावे या मागणीसाठी पर्यावरणप्रेमींनी मोहीम हाती घेतली होती. अखेर राष्ट्रीय समुद्रीविज्ञान संस्थेने नोव्हेंबर २०२० मध्ये वरळी किनाऱ्यालगतच्या १८, तर हाजीअली किनाऱ्याजवळील ३२९ प्रवाळ वसाहती कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात स्थलांतरित केल्या होत्या.

सध्या हाजीअली परिसरात युद्धपातळीवर सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील किनारा मार्गाचे काम २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे. असे असतानाही दोन दिवसांपूर्वी हाजीअली समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात ‘फाॅल्स पिलो’ प्रवाळ आढळले आहेत. इतकेच नव्हे तर  या ठिकाणी प्रवाळांच्या वसाहती वाढत असल्याची माहिती ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’चे सहसंस्थापक प्रदीप पाताडे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाळ हे अपृष्टवंशीय असून त्याचे अस्तित्व खडकाळ भागात किंवा समुद्राच्या तळाशी असते. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रवाळ क्षेत्रांना  संरक्षण प्राप्त आहे. प्रवाळ भित्तीका ही समुद्राच्या तळावरील लाखो पॉलीप्सने तयार केलेली रचना आहे. त्यांना त्यांच्या उच्च जैव विविधतेमुळे समुद्राच्या तळाशी असलेले ‘वर्षावन’ असेही संबोधण्यात येते.