तीन वर्षांत पश्चिम रेल्वे हद्दीतील १,१७२ बांधकामांवर कारवाई

मुंबई : पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानक हद्दीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येत असून गेल्या तीन वर्षांत १,१७२ अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला. ही कारवाई के ल्यानंतर पुन्हा बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. करोनाकाळातही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आल्याचे कारवाईतून समोर आले आहे.

रेल्वे हद्दीत विविध प्रकारची बेकायदा बांधकामे उभारली जातात. यात रहिवासी झोपड्या, दुकाने व अन्य बांधकामांचा समावेश असतो. एक-दोन मजली दुकाने आणि झोपड्या उभारण्यात येतात. तसेच रेल्वे परिसरातील जुन्या इमारतींच्या परिसरात अनधिकृतपणे बांधकामे करून रेल्वेची जागा हडप करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. बेकायदा बांधकामे उभी राहिल्याने तेथून अनधिकृत प्रवेशद्वारही करण्यात येते. त्यामुळे स्थानकात प्रवेश करणे किं वा रूळ ओलांडण्याचेही प्रकार होतात.

अशा बांधकामांवर पश्चिम रेल्वेच्या संबंधित विभागाकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येतो. २०१९-२० मध्ये ६८१ बेकायदा बांधकामांवर हातोडा पडला आहे. त्यानंतर करोनाकाळातही पुन्हा बेकायदा बांधकामांनी डोके  वर काढले आणि त्यावर कारवाईशिवाय रेल्वेला पर्याय राहिला नाही. २०२०-२१ मध्ये २५७ आणि २०२१-२२ मध्ये उभी राहिलेली २३४ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य रेल्वेवरही बेकायदा बांधकामे

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील मशीद रोड स्थानक, भायखळा, दादर, शीव, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण यांसह अन्य काही स्थानकांच्या हद्दीतच बेकायदा बांधकामे उभी राहतात. त्यावरही कारवाई केली जात असल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्याने दिली.