पुलाच्या उभारणीसंदर्भात दिवाळीनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

दीड वर्षांपेक्षाही जास्त काळ उलटूनही पाडण्यात आलेला सण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना असा हँकॉक पूल बांधण्यासाठी अद्यापही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात हा पूल बांधण्यासंदर्भात १८ सप्टेंबर २०१७ रोजी सुनावणी पार पडली. या वेळी न्यायालयाकडून सविस्तर सुनावणीसाठी दिवाळीनंतरची तारीख देण्यात आली आहे. दिवाळीच्या पहिल्या आठवडय़ात सुनावणी होईल. हँकॉक पूल पाडल्यानंतर आतापर्यंत २५ जणांचा सॅण्डहर्स्ट रोड स्थानक हद्दीत रुळ ओलांडताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा पूल बांधणे महत्त्वाचे झाले आहे.

हँकॉक पुलावर पालिकेकडून १८ नोव्हेंबर २०१५ पासून हातोडा चालविण्यात आला आणि हँकॉक पूल वाहने आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. मध्य रेल्वेच्या सॅण्डहर्स्ट रोड स्थानकावर येणाऱ्या या पुलाचा महत्त्वाचा भाग २०१६च्या जानेवारी महिन्यात ब्लॉक घेऊन तोडण्यात आला. पूल तोडल्यामुळे स्थानिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला. पूल नव्याने मुंबई पालिकेकडून बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. मात्र काळ्या यादीतील कंत्राटदारांना हे काम पालिकेने दिल्याचे समोर येताच त्यानंतर पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याविरोधात कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर निविदांचेही काम थांबले. यासंदर्भात मुंबई महापालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) शी. ओ. कोरी यांनी सांगितले की, सध्या सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाकडून दिवाळीनंतरची तारीख सुनावणीसाठी देण्यात आली. हँकॉक पूल हा स्थानिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असून त्याची सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला केली आहे.

सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानक हद्दीत रुळ ओलांडताना लोकलची धडक लागून २०१६ रोजी २० जणांचा आणि हँकॉक पूल तोडण्यात आला आहे, त्या ठिकाणी तर चार जणांचा आणि २०१७ मध्येही रेल्वेची धडक लागून एकाचा मृत्यू झाला आहे. रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी या ठिकाणी आता रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तरीही या ठिकाणी होणारे अपघात पूर्णपणे थांबलेले नाहीत.

नवीन पुलाचे फायदे

*  सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाच्या आसपास रेल्वेगाडय़ांची वेगमर्यादा ताशी ५० किमी होईल.

* पुलाजवळील रुळांची उंची वाढवण्यात येईल. त्यामुळे या ठिकाणी रुळांवर पाणी साचणार नाही. सध्याच्या पुलाची उंची ४.९ मीटर एवढी होती आणि ती नंतर ६.५२५ एवढी करण्यात येईल.

* ओव्हरहेड वायर आणि पेन्टाग्राफमध्ये तांत्रिक समस्या उद्भवणार नाही.

* जुन्या पुलाची रुंदी ही ६० मीटर एवढी होती. नवीन पूल बांधताना रुंदी वाढवून ९० मीटर केली जाईल.