मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर रोजचीच गोंधळांची मालिका सुरू आहे. आतापर्यंत या मालिकेच्या भागांत रूळाला तडा जाणे, गाडी रूळावरून घसरणे अशा दुर्घटना घडल्या असून मंगळवारच्या भागात सिग्नल यंत्रणेतील बिघाड झाला. त्यातच पनवेल आणि नेरूळ या दोन स्थानकांवर प्रवाशांनी रेल रोको केल्याने दिरंगाईचा ‘टीआरपी’ वाढून या भागात रंगत आली. तब्बल दीड तास चाललेल्या या गोंधळाच्या ‘महा एपिसोड’दरम्यान हार्बर मार्गावरील ३५ सेवा रद्द करण्यात आल्या, तर ६० सेवा खोळंबल्या.
हार्बर मार्गावर मंगळवारी सकाळी ७.५०च्या दरम्यान वाशी स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. या बिघाडानंतर हार्बर मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली.
याचा परिणाम दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर झाला आणि हार्बर मार्गावरील वाहतूक तासभर रखडली. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी सकाळचे ९.११ वाजले. गेले काही दिवस हार्बर मार्गावर सातत्याने बिघाड होत असल्याने प्रवाशांचा संताप शिगेला पोहोचला होता. त्याचा संतापाचा स्फोट मंगळवारी पनवेल आणि नेरूळ या स्थानकांत झाला.