‘मेरा चेहरा ठीक तो हो जाएगा ना?’ मेरा करियर खराब तो नही होगा ना? हे आर्त सवाल आहेत प्रीती राठी या तरुणीचे. गुरुवारी वांद्रे स्थानकात अज्ञात हल्लेखोराने फेकलेल्या अ‍ॅसिडमुळे जखमी झाल्याने तिच्यावर भायखळ्याच्या मसिहा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असली तरी तिचा डावा डोळा वाचण्याची शक्यता फारच कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दिल्लीत राहणारी प्रीती आर्मी मेडिकल महाविद्यालयात नर्सच्या नोकरीसाठी आली होती. वडील आणि मावशीसोबत ती गुरुवारी सकाळी वांद्रे स्थानकात उतरल्यावर एका अज्ञात इसमाने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. या हल्ल्यात तिचा चेहरा २० टक्के भाजला होता. तिचा डावा डोळा जवळपास निकामी झाला असून तो पूर्ववत होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. तिची अन्ननलिका आणि श्वसननलिका पुन्हा कार्यरत होईल पण त्यासाठी अजून ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागणार आहे. ती सध्या बोलू शकत नाही. त्यामुळे कागदावर लिहून ती आपल्या भावना व्यक्त करत आहे.
गुरुवारी पोलिसांनी जारी केलेले रेखाचित्र सदोष असल्याने शुक्रवारी पोलिसांनी पुन्हा नव्याने रेखाचित्र तयार केले आहे. वांद्रे रेल्वे पोलीस दिल्लीत जाऊन प्रीतीच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांची चौकशी करून प्रीतीवर कोण एकतर्फी प्रेम करत होता का ते तपासणार आहेत. गरीबरथ एक्सप्रेस मधील रिझव्‍‌र्हेशनच्या नावांची पडताळणीही सुरू करण्यात आलेली आहे. अ‍ॅसिड फेकणाऱ्याला हे काम करण्याची सुपारी दिली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
शुक्रवारी महापौर सुनील प्रभू यांनी तिची भेट घेतली. स्थानिक शिवसैनिकांनी तिचे वडील आणि मावशीची राहण्याची व्यवस्था जवळच्या हॉटेलमध्ये केली आहे. तर महिला शिवसैनिकांना तिच्या मावशीच्या सोबत ठेवण्यात आले आहे.