मुंबई : पवईत अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण करणाऱ्या एका फेरीवाल्याला अटक करण्यात आली असून या हल्ल्यात तीन पोलीस गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणातील तीन हल्लेखोर अद्याप फरार आहेत.

पवईमधील मिलिंद नगर येथे सायकल मार्गिकेवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. याबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या. पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर नलावडे, पोलीस हवालदा ज्ञानदेव वगेरे आणि विजय घाडगे हे मंगळवार, २० मे रोजी कारवाई करण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी फेरीवाला किशनकुमार कटारिया याने पोलीस हवालदार घाडगे यांना बांबूने माराहण केली. ते पाहून नलावडे आणि वगेरे मध्ये पडले. मात्र अन्य तीन फेरिवाल्यांनी पोलिसांवर हल्ला केला. हवालदार वेगारे यांच्यावर लोखंडी सळईने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात तिघे पोलीस गंभीर जखमी झाले. घाडगे यांच्या पायला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली तर पोलीस उपनिरीक्षक नलावडे यांच्या पाठीला मार लागला. तिन्ही पोलिसांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पवई पोलिसांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेत हल्लेखोरांविरोधात पोलिसांच्या हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मुख्य हल्लेखोर किशनकुमार कटारिया याला पोलिसांनी अटक केली असून तीन हल्लेखोर फेरीवाले फरार आहेत.