मुंबई : आरोग्य विभागामध्ये ‘गट ब’ या पदावर कार्यरत असलेल्या जवळपास ७५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना सरकारकडून गेल्या अनेक वर्षांपासून पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. यातील अनेक अधिकाऱ्यांची सेवा २४ वर्ष तर काही अधिकाऱ्यांची तीन वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे. पदोन्नती मिळत नसल्याने त्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान होत असून, ते प्रचंड तणावाखाली वावरत आहेत.

आरोग्य विभागामध्ये आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘गट ब’ संवर्गातील अधिकारी कार्यरत आहेत. राज्यात आरोग्य विभागातील विविध कार्यालयांमध्ये जवळपास ७५० वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. सरकारी नियमानुसार नियुक्तीनंतर तीन वर्षांनी पदोन्नती मिळणे गरजेचे असते. मात्र ‘गट ब’ संवर्गामध्ये कार्यरत असलेल्या जवळपास ७५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती झाल्यापासून एकदाही पदोन्नती मिळाली नाही. यातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची २४ वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे. तर अनेक वैद्यकीय अधिकारी हे कोणतीही पदोन्नती न घेता निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांना मानसिक तणावालाही सामोरे जावे लागत आहे.
‘गट ब’ संवर्गातील बीएएमएस असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती न दिल्याने त्यांच्यासाठी असलेला पदोन्नतीचा कोटा अनेक वर्षांपासून तसाच आहे. कोटानिहाय उपलब्ध असलेल्या जागेनुसार सध्या जवळपास २५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘गट अ’ संवर्गात पदोन्नती मिळू शकते. मात्र वेळेवर पदोन्नतीची प्रक्रिया न केल्याने अनेक अधिकारी पदोन्नतीशिवायच निवृत्त झाले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ‘गट ब’ संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघ प्रयत्नशील आहे. सर्व उपसंचालक कार्यालयामार्फत ‘गट ब’ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव जून २०२३ पूर्वी संचालक कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. तसेच पदोन्नतीचे परिपूर्ण प्रस्ताव तत्काळ व कालमर्यादेत सादर करण्याबाबत आरोग्य विभागाच्या सचिवांना १३ स्मरणपत्र पाठवण्यात आले आहेत. तरी देखील गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. जानेवारी २४ मध्ये गट अ संवर्गात २८३ पदांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सरळसेवा पदभरती जाहीर करण्यात आली. यामुळे अनेक वर्ष सेवा करून न्याय मिळत नसल्याने ‘गट ब’ अधिकारी यांच्यामध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांनी दिली.

पदोन्नती झाल्यास कंत्राटी अधिकाऱ्यांनाही लाभ

‘गट ब’ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्यास गेल्या २० वर्षांपासून ३० ते ४० हजार वेतनावर कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या अधिकाऱ्यांनाही कायम होण्याची संधी मिळेल. तसेच नवीन भरती सुद्धा करता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवस कार्यक्रमामध्ये गट ब संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय प्राधान्याने घेऊन अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्याय द्यावा. डॉ. अरुण कोळी, राजाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघ