मुंबई : गर्भवती महिला व एक वर्षाच्या बाळाच्या आरोग्याची नेमकी काळजी कशी घ्यायची हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.गर्भारपणाच्या काळात महिलांनी योग्य काळजी न घेतल्यास त्याचा बाळावर परिणाम होतो हे सर्वच जाणतात पण नेमकी काळजी काय घ्यायची तसेच बाळाच्या जन्मानंतर एक वर्षापर्यंत कशाप्रकारे आरोग्य जपायचे याचे नेमके मार्गदर्शन आरोग्य विभागाच्या ‘किलकारी’ या मोबाईल सेवेच्या माध्यमातून करण्यात येते. याचा लाभ गेल्या दीड वर्षात तब्बल ३४ लाख ७२ हजार महिलांनी घेतला आहे.
केंद्र शसानाच्या आरोग्य विभागातर्फे ‘किलकारी’ ही मोबाईल आरोग्य सेवा गर्भवती माता व एक वर्षाखालील बालकांच्या कुटुंबियांसाठी असून या सेवेच्या माध्यमातून आरोग्यविषयक योग्य माहिती आठवड्याला एकदा थेट त्यांच्या मोबाईलवर मिळते. नोंदणी केलेल्या गरोदर मातेला गर्भधारणेच्या चौथ्या महिन्यापासून मोबाईलवर मोफत व स्थानिक भाषेत मोफत सरकारी योजना, औषधे, आहार, लसीकरण, मानसिक, शारीरिक स्थिती इत्यादी बाबतचे मार्गदर्शन बाळ एक वर्षाचे होईपर्यंत केले जाते. केंद्राची ही योजना महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून सुरु असून ३१ जुलै २०२५ पर्यंत तब्बल ३४ लाख ७२ हजार महिलांनी याचा लाभ घेतल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद (आयव्हीआर) आधारित या सेवेमध्ये गरोदरपण, प्रसूती आणि बाल संगोपन या संदर्भातील एकूण ७२ ध्वनिमुद्रित संदेश क्रमवार दिले जातात. गरोदर मातेला गर्भधारणेच्या चौथ्या महिन्यापासून व नवमातेला बाळाचे वय एक वर्ष होईपर्यंत प्रत्येक आठवड्यात 1600103660 या क्रमांकावरून कॉल येतात. जर कॉल चुकला तर 14423 या मोफत क्रमांकावर कॉल करून संबंधित संदेश पुन्हा ऐकता येतो.
प्रामुख्याने ग्रामीण भागात ही योजना जास्तीत जास्त पोहोचावी असा आरोग्य विभागाचा उद्देश असून या मोबाईल संदेशानंतर गभवती महिला तसेच जास्तीत जास्त बाळांनी आरोग्य व्यवस्थेमध्ये येऊन उपचार घ्यावे ही या यजनेमागील उद्देश असल्याचे आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. ज्या कुटुंबाना ‘किलकारी’ मोबाईल सेवेमध्ये नोंदणी करायचे असते त्यांनी गर्भधारणेची किंवा बाळाच्या जन्माची नोंदणी आशाताई, आरोग्य सेविका यांच्याकडे अथवा शासकीय आरोग्य केंद्रात करणे अपेक्षित आहे.
नोंदणी करताना तुम्हाला ज्या मोबाईल क्रमांकावर किलकारी कॉल्स प्राप्त करायचे आहेत किंवा जो मोबाईल मातेजवळ असेल त्याच मोबाईल चा क्रमांक द्यावा. गर्भधारणेची नोंदणी झाल्यानंतर, भारत सरकारच्या आर.सी.एच. पोर्टलवर तुमच्या माहितीची नोंद होईल आणि तुम्हाला किलकारीकडून मोफत कॉल येणे सुरू होईल. तुमच्या मोबाईलमध्ये किलकारीचा क्र. 1600103660 सेव्ह करा आणि न चुकता दर आठवड्याला तुमच्या मोबाईलवर किलकारी कॉल आवर्जून ऐका.आठवड्यातून एकदा तुम्हाला किलकारीचा फोन येईल. तसेच तुमचे बाळ १ वर्षाचे होईपर्यंत तुम्हाला हे कॉल प्रत्येक आठवड्याला येत राहतील.
समजा एखादा कॉल चुकला उचलू शकले नाही तर व त्या आठवड्याचा संदेश पुन्हा ऐकायचा असेल, तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 14423 डायल करून किलकारी संदेश अगदी मोफत पुन्हा ऐकू शकता.