मुंबई : बदलापूर येथील शाळेत बालकांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असतानाही त्याचे अद्याप पालन झालेले नाही. गुन्हा दाखल करण्याची मुदत शनिवारी संपली असून उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे हा या प्रकरणाती मुख्य आरोपी होता. २३ सप्टेंबर २०२४ रोजी तळोजा तुरुंगातून कल्याणला नेत असताना पोलीस चकमकीत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. ही चकमक बनावट असल्याचा आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. दरम्यान, ७ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. सरकारी वकील हितेने वेणेगावकर यांनी ३ मेपर्यंतची मुदत मागितली होती. ही मुदत शनिवारी संपली, मात्र तरीही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. उच्च न्यायालयाच्या ७ एप्रिलच्या आदेशाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज, ५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास वारंवार टाळाटाळ

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा दाखला देऊन सरकारने आधी प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यास वेळ देण्याची मुदत उच्च न्यायालयाकडे मागितली होती. तथापि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आमच्या आदेशाचे पालन सरकारला करावेच लागेल, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने अवमान कारवाईचा इशारा सरकारला दिला होता. त्यानंतर सरकारने प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला. त्यावेळीही न्यायालयाने एसआयटीला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी कोणी तक्रारदार नसल्याची सबब सरकारतर्फे त्यानंतरच्या सुनावणीच्या वेळी पुढे करण्यात आली. न्यायालयाने त्यावेळीही सरकारच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आणि पुन्हा अवमान कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर माघार घेऊन शनिवार, ३ मेपर्यंत अक्षय शिंदे याच्या चकमकीस न्यायदंडाधिकाऱ्यांनी जबाबदार ठरवलेल्या पाच पोलिसांवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी हमी सरकारने उच्च न्यायालयाला दिली होती.

पोलिसांवर अजूनही गुन्हा दाखल नाही

मुंबई उच्च न्यायालयाने ७ एप्रिल रोजी अक्षय शिंदे चकमक प्रकरणातील जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज, ५ मे रोजी सुनावणी होणार आहे.