jराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवसस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह धरणाऱ्या अमरावतीच्या राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. प्रक्षोभक वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी सध्या कारागृहात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने घरचे जेवण मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यांच्या या आणि त्यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणं अपेक्षित आहे.

राणा दाम्पत्याला अटक करण्यात नंतर वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस कोठडीऐवजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्या वेळीच राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जावर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचाही आरोप असल्याने नंतर त्यांनी वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांसमोरील जामीन अर्ज मागे घेऊन जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयानेही त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. सरकारी पक्षाने भूमिका मांडण्यासाठी वेळ हवा असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार दोन्ही पक्षांना वेळ देण्यात आलेला.

काय युक्तीवाद होऊ शकतो?
न्यायमुर्ती राहुल रोकडे यांनी शुक्रवारी सुनावणी घेऊच असं निश्चित सांगता येत नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे राणा दांपत्याच्या अर्जावर आजच सुनावणी होणार की त्यांना सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार हे ११ वाजता न्यायालयाचं कामकाज सुरु झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यातही आज कदाचित केवळ राणा दांपत्याला त्यांची वेळ मांडण्यापुरती वेळ न्यायालयाकडून मिळू शकते. तर दुसरीकडे सरकारी पक्षाकडून मुंबई पोलिसांची भूमिका आज लेखी स्वरुपामध्ये न्यायालयासमोर सादर केली जाणार आहे. सरकारची आतापर्यंतची भूमिका पाहता सरकारकडून या जामीन अर्जाला विरोध केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राणा दांपत्य तुरुंगाबाहेर पडल्यास, त्यांना जामीन दिल्यास पुन्हा आपत्तीजनक वक्तव्य करुन ते तेढ निर्माण करु शकतात अशापद्धतीचा युक्तीवाद सरकारकडून केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे राणा दांपत्याला आज दिलासा मिळतो की नाही हे काही तासांमध्ये स्पष्ट होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.