लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई आणि उपनगरांमध्ये एप्रिलपासून उन्हाचा तडाखा वाढला असून उन्हाच्या वाढत्या झळांमुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुंबई उपनगरांत अवघ्या महिनाभरात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, तसेच रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मार्चपासून वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांना उष्माघाताच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत उष्माघाताचे १,६१६ संशयित रुग्ण सापडले असून, त्यातील १,४७७ रुग्ण उष्माघाताचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईमध्ये १६ मेपर्यंत उष्माघाताचे १५५ संशयित रुग्ण सापडले आहेत. मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्म्यामुळे महिनाभरात उष्माघाताच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. मुंबईमध्ये १२ एप्रिलपर्यंत उष्माघाताचे ७२ संशयित रुग्ण सापडले होते, तर १६ मेपर्यंत या रुग्णांची संख्या १५५ वर पोहोचली.

आणखी वाचा- मुंबई: नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीत आग, १२ झोपड्या आगीत भस्मसात; दोघे जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील वाढता उष्मा लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉक्टांनी दिला आहे. उष्माघाताच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने सार्वजनिक रुग्णालयात आवश्यक उपचारासाठी सुविधा उपलब्ध करण्याची सूचना सर्व रुग्णालयांना केली आहे. क्षेत्रीय पातळीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही उष्णता विकार प्रतिबंध आणि नियंत्रणविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्याकडे क्षार संजीवनी, ग्लुकोज पावडर आणि पॅरासिटॅमॉल अशी आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.